छत्रपती संभाजीनगर : महिनाभरात दोनदा झालेल्या वादातून नशेखोरांच्या टोळीने समीर खान इनायत खान (३०, रा. काचीवाडा, शहाबाजार) यांची भर रस्त्यात पाचजणांनी तलवारीने गळा चिरून आणि पाय तोडून तरुणाची निर्घृण हत्या केली. ही घटना निशान दर्ग्याजवळ, शहाबाजार, चंपा चौक परिसरात शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.
समीर खान इनायत खान (३०, रा. काचीवाडा, शहाबाजार), असे मृताचे तर आसिफ रायडर, शोएब काला, इसरार खान, नसीर इन्ता आणि असलम चाऊस, अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मृताची पत्नी सना कौसर समीर खान (२५) हिच्या तक्रारीवरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना २ ते १० वर्षांच्या तीन मुली आहेत. समीर हा शहागंज भागात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा. २८ ऑक्टोबर रोजी शोएब अन्वर खान आणि समीर व शाहरूख यांचा वाद झाला होता. त्यावरून शोएबने समीर आणि शाहरूखविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तर, समीरनेही २९ ऑक्टोबर रोजी आसिफ रायडर, हाफिज ऊर्फ टकला, शोएब काला यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.
तेरा मर्डर करूंगा
वादानंतर आरोपी आसिफ रायडरने समीर खानला फोन करून ‘तुझे किसी के हाथ से मार दुंगा, तेरा मर्डर करूंगा’, अशी धमकी दिली होती. त्यानंतर लगेचच दोन दिवसांतच पाचजणांच्या टोळीने समीर खानचा गळा छाटून खून केला.
३० सेकंदात तिघांनी काढला काटा
३१ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता समीर खान हा त्याचा मित्र शारेक बाली याला भेटण्यासाठी दुचाकीने (एमएच २०, जीडी ४०५८) निघाला. तीन हल्लेखोरांनी शहाबाजारमध्ये निशान दर्ग्याजवळ समीर खानला गाठले आणि अवघ्या ३० सेकंदात तलवारीने त्याचे मुंडके छाटून हत्या केली. पायदेखील तोडला. तिन्ही हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. काही वेळातच शारेक बालीने हा प्रकार समीरच्याच फोनवरून त्याच्या पत्नीला कळविला. त्यानंतर सना कौसर हीने तिचा भाऊ जाबिरला माहिती दिली आणि घटनास्थळी धाव घेतली.
पाचही आरोपी ताब्यात
घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरमेठ यांच्यासह उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख, पोलीस निरीक्षक सुनील माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक भागवत मुठाळ, अजित दगडखैर आदी अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. गुन्हे शाखा आणि सिटी चौक ठाण्याच्या विशेष पथकाने पाचही आरोपींना पकडल्याची माहिती कल्याणकर यांनी माध्यमांना दिली.






















































































































































































