
छत्रपती संभाजीनगर: एका तरुणाचे नाव घेत मस्जीद बॉंबस्फोटाने उडवून देण्याचा फेक कॉल ३१ मार्चला शहर पोलीस आयुक्तलयातील नियंत्रण कक्षाला आला होता. बीडमधील घटना आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा प्रकार अती गांभीर्याने घेत मुळापर्यंत जण्याचा निर्णय घेतला. तब्बल चार आठवडे तांत्रिक तपास करीत पुणे येथे राहणाऱ्या उच्चशिक्षीत मात्र विक्षीप्त तरुणाला अटक केली. पोलिसांना त्रास व्हावा या खोडसाळपणातून हा कॉल केल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
३० मार्च रोजी बीड जिल्ह्यातील एका मस्जीदसमोर ब्लास्ट झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. ३१ मार्च रोजी रमजान ईद होती. याच दिवशी नियंत्रण कक्षात अनोळखी तरुणाने कॉल केला. विलास डोईफोडे बॉंब ब्लास्ट करणेवाला है, मस्जीदमे असे म्हणत त्याने कॉल कट केला. हा कॉल पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतला. विलास डोईफोडे याचा शोध घेतला असता तो राजनगर, मुकूंदवाडी येथील तरुण निघाला. पोलिसांनी डॉग स्कॉडसह त्याच्या घराची झडती घेतली. परंतु त्याच्याकडे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
आरोपीने नियंत्रण कक्षाला केलेला कॉल हा व्होक्स कॉल म्हणजेच इंटनरनेटचा वापर केलेला व्हर्चुअल कॉलचा प्रकार होता. याचा सखोल तांत्रीत तपास करण्यात आला. परदेशात पत्रव्यव्हार करून याची माहिती घेण्यात आली. यावेळी हा मोबाईलधारक आरोपी दिपक शाहुबा ढोके (४६, मुळ रा. एन ११, टिव्ही सेंटर, दत्त मंदिराजवळ, सध्या रा. फ्लॅट क्रमांक ४०७, शुभम पॅलेस, चैतन्यनगर, धनकवडी, पुणे) हा असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीचा शोध लागल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पथक रवाना झाले. आरोपीचा पत्ता शोधण्यात आला. पुणे सहकारनगर पोलिसांची मदत देखील घेण्यात आली. आरोपी दिपक घरातच होता. त्याला बाहेर काढण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्याला वेळोवेळी आवाज देण्यात आला. मात्र आरोपीने प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी आरोपी घराच्या बाहेर यावा म्हणून त्याच्या घराचा विद्युत पुरवठा देखील बंद केला. मात्र आरोपीवर काहीही फरक पडला नाही. शेवटी पोलिसांनी कोर्टाकडून आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी वॉरंट आणले. त्याच्या घराचा दरवाजा तोडत असताना शेवटी आरोपीने घाबरुन दरवाजा उघडला. त्याच्या फ्लॅटची झडती घेतली असता काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्याला अटक करुन शहरात आणण्यात आले. धमकीचा कॉल त्याने पोलिसांना त्रास देण्यासाठी केल्याची माहिती दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, एसीपी सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप गुरमे, पीएसआय विशाल बोडके, संजय गावडे, बाळू नागरे, तात्याराव शिनगारे यांनी केली.