सर्वसामान्यांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता हरपला !: नाना पटोले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे आकस्मिक निधन

A worker who worked with common people is lost!: Nana Patole
A worker who worked with common people is lost!: Nana Patole

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे आकस्मिक निधन मोठा धक्का देऊन गेले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत छाजेड काँग्रेस विचारासाठी व कामगारांसाठी काम करत राहिले. तळमळीने तसेच सर्वसामान्यांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आज आपल्यात नाही, अशा भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole)यांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय जयप्रकाश छाजेड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन, दादर येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मा. खा. हुसेन दलवाई, रेल्वे युनियनचे प्रविण वाजपेयी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे,  प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, राजेश शर्मा, राजन भोसले, जो. जो. थॉमस, प्रा. प्रकाश सोनावणे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, जयप्रकाश छाजेड शेवटपर्यंत पक्षाचे व इंटकचे काम प्रामाणिकपणे करत राहिले. ज्या दिवशी निधन झाले त्या दिवशीही ते नागपूरमधील कार्यकारिणीच्या सभेला जाण्याची तयारी करत होते. छाजेड यांच्याबरोबर एकत्र काम केले. कामगार वर्गासाठी लढा देणे हे सोपे काम नाही परंतु महाराष्ट्र इंटकच्या माध्यमातून त्यांनी कामगारांसाठी चांगले काम केले. एस. टी. कामगारांचे प्रश्नही ते वेळोवेळी लावून धरायचे.

शासनाकडे सतत पाठपुरावा करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विधान परिषदेतही त्यांनी कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडले. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता, लोकांशी ते सतत जोडलेले असत. कामगार क्षेत्राबरोबर सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रातही ते कार्यरत असत. जयप्रकाश छाजेड यांचे निधन झाले असले तरी त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप म्हणाले की, जयप्रकाश छाजेड हे एखादी जबाबदारी स्विकारली की ती तडीस नेत असत. कामगार, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठे काम केले. कामगारांच्या अनेक समस्या सोडण्यासाठी त्यांच्यासोबत एकत्र काम केले. असंघटीत क्षेत्रासाठी पहिला कायदा महाराष्ट्राने केला त्यात जयप्रकाश छाजेड यांचेही मोठे योगदान होते.

कामगार क्षेत्रातील आव्हाने आता पूर्णपणे बदलली आहेत, चेहरा मोहरा बदलला आहे. या क्षेत्रासाठी आता जास्त काम करावे लागणार आहे याची जाण ठेवून छाजेड यांचे अपूर्ण राहिलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. शोकसभेत अनेक मान्यवरांनी जयप्रकाश छाजेड यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भजनाचा कार्यक्रमही झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here