khushbu sundar : “८ वर्षांची असल्यापासून वडील माझं लैंगिक शोषण करत होते”, भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचा धक्कादायक खुलासा!

actress-bjp-leader-khushbu-sundar-on-father-sexually-abused-at-age-8-news-update-today
actress-bjp-leader-khushbu-sundar-on-father-sexually-abused-at-age-8-news-update-today

नवी दिल्ली: सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. आठ वर्षांच्या असल्यापासून त्यांचे वडील त्यांचं लैंगिक शोषण करत होते, असं त्यांनी सांगितलं आहे. बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये खुशबू सुंदर यांनी हा खळबळजनक खुलासा केला असून त्यावर आता खुशबू यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं या मुलाखतीच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. यावेळी बोलताना खुशबू सुंदर यांनी आपल्याला याविषयी बोलताना आई विश्वास ठेवणार नाही, अशी लहानपणी मला भीती वाटायची, असंही सांगितलं आहे.

खुशबू सुंदर या दक्षिणेतील एक प्रथितयश अभिनेत्री आहेत. २०१०मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०२०मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. नुकतीच खुशबू सुंदर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या बालपणीचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

 काय म्हणाल्या खुशबू सुंदर?

खुशबू सुंदर यांनी त्यांच्या बालपणीच्या त्या धक्कादायक अनुभवाविषयी सांगताना वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचं सांगितलं. “मला वाटतं की जेव्हा एका लहान मुलाचं किंवा मुलीचं लैंगिक शोषण होतं, तेव्हा त्याला आयुष्यभर मानसिक त्रास सहन करावा लागतो. माझ्या आईला भयंकर कौटुंबिक हिंसेचा सामना करावा लागला. एका अशा पुरुषाशी तिने संसार केला, ज्याला अलं वाटायचं की त्याच्या पत्नीला मुलांना मारहाण करणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जो त्याच्या एकुलत्या एक मुलीचं लैंगिक शोषण करायचा”, असं खुशबू सुंदर या मुलाखतीमध्ये म्हणाल्या आहेत.

“मला एका गोष्टीची कायम भीती वाटायची की…”

“मी आठ वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते. जेव्हा मी १५ वर्षांची झाले, तेव्हा माझ्यामध्ये त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत आली. कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून मी आठ वर्षं गप्प राहिले. मला एका गोष्टीची कायम भीती वाटत राहायची. ‘काहीही झालं तरी माझा पती म्हणजे परमेश्वर आहे’ अशा मानसिकतेची माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. पण जेव्हा मी १५ वर्षांची झाले, मी वडिलांविरोधात बोलायला सुरुवात केली. मी १६ वर्षांचीही नव्हते, जेव्हा ते आम्हाला सोडून निघून गेले. तेव्हा आम्हाला हेही माहिती नव्हतं, की आमचं पुढचं जेवण कुठून येणार आहे”, अशा शब्दांत खुशबू सुंदर यांनी त्यांची आपबीती व्यक्त केली आहे.

“माझं बालपण फार कठीण होतं. पण हळूहळू त्याविरोधात आवाज उठवण्याची हिंमत माझ्यामध्ये निर्माण झाली”, असंही खुशबू सुंदर यांनी नमूद केलं.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here