मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या उपस्थितीत प्रा. आदिती पोहरे आणि धाराशिव जिल्ह्यातील ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
प्रा. आदिती पोहरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्या माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. त्यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्ट्रक्चरल डिझाइन विषयात एम.ई. पदवी, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात एम.ए. पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे.
या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धाराशिव जिल्ह्यातील ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रा. आदिती पोहरे आणि ॲड. रविंद्र नागरगोजे यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, रजनीताई पाटील, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार कल्याण काळे, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री विश्वजित कदम, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार यांचीही यावेळी उपस्थिती होती.




























































































































































