घोटाळे, लफडी पासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला!

आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदार, खासदारांवर हल्लाबोल

aditya-thackeray-slams-rebel-camp-as-shiv-sena-splits-in-the-lok-sabha-with-12-mps-joining-shinde-group-news-update-today
aditya-thackeray-slams-rebel-camp-as-shiv-sena-splits-in-the-lok-sabha-with-12-mps-joining-shinde-group-news-update-today

मुंबई: शिवसेनेविरोधात (ShivSena) बंडखोरी करणाऱ्यांच्या फाईल्स उघडल्या गेल्याने त्यांनी पक्षाविरोधात गद्दारी केली, असा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर नेत्यांवर टीका करताना केला आहे. मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी १२ खासदारांनी शिंदे गटाला (Shinde Group) पाठिंबा दिल्यानंतर बोलताना ही टीका केली आहे. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेतील पळापळीचा दुसरा अंक मंगळवारी दिल्लीत रंगला. शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली असून, त्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली़ राज्यातील शिंदे गट-भाजपच्या युती सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

याच खासदारांच्या बंडखोरीनंतर मुंबईमध्ये सध्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणाऱ्या आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन आधी आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना आणि बंडखोरांना लक्ष्य केलं. “आपण दिल्लीसमोर जाऊन झुकतोय. दिल्लीकडे आपण महाराष्ट्राच्या मदतीसाठी काही पॅकेज मागत नाही, गुवाहाटीला, सुरतेला जाऊन मजा करता याला तुम्ही बंडखोरी तरी कशी म्हणता?” असा प्रश्न आदित्य यांनी विचारला आहे.

ही बंडखोरी नसून गद्दारी असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी या बंडखोर नेत्यांची वेगवेगळी प्रकरणं उघड झाल्याने त्यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेतल्याचा आरोप केला. “तुमच्यावर दडपण असेल, तुमच्या काही फाईल्स उघडल्या असतील. पण घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि लपवायला कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा तर पक्षप्रमुखांच्या,” असं म्हणत आदित्य यांनी बंडखोरांना लक्ष्य केल आहे.

“शिवसेनेशी गद्दारी करायची नंतर बोलायला मोकळे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, महाराष्ट्र धर्मासाठी गेलो. हे सगळं थोतांड आहे. त्यांना स्वत:ला वाचवायचं होतं म्हणून त्यांनी तुमच्याबरोबर, आमच्याबरोबर गद्दारी केलीय,” असं आदित्य ठाकरे  शिवसैनिकांसमोर दिलेल्या भाषणात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here