१०० कोटी वसुली प्रकरणात CBI कडून संतोष जगतापला अटक!

no-more-evidence-to-share-against-ex-home-minister-anil-deshmukh-says-parambir-singh-news-update
no-more-evidence-to-share-against-ex-home-minister-anil-deshmukh-says-parambir-singh-news-update

मुंबई: अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) विरोधात सुरू असलेल्या १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने (CBI) पहिली अटक केली आहे. संतोष जगताप (Santosh jagtap) या मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे. जगताप याला ठाण्यातून अटक केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप केला होता. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.

या प्रकरणात सीबीआयने पहिली अटक केली आहे. संतोष जगताप जो मध्यस्थी म्हणून काम करत होता त्याला सीबीआयने ठाण्यातून अटक केली आहे. याआधी सीबीआय अहवाल लीक केल्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली होती. दरम्यान, १०० कोटी वसुली प्रकरणात पहिली अटक असून संतोष जगताप याला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

संतोष जगताप याचा अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका आढळून आली होती. त्याच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सीबीआयने संतोष जगताप याच्या ठाण्यातील घरी सर्च ऑपरेशन केलं होतं ज्यामध्ये ९ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती. जगताप याला तपासात सहकार्य करण्यास सीबीआयने सांगितलं होतं. मात्र तो चौकशीला गेला नाही.

मागील महिन्यात त्याच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट जारी केलं होतं. आज त्याला ठाण्यातून सीबीआयने अटक केली आहे. जगताप याला ४ नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याची हद्द मुंबई असल्याने पुढचा तपासही मुंबईतच होणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते, असे आरोप करणारे पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती.

परमबीर सिंह यांनी हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवले होते. या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारमधून दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करण्यात आला होता.

या लेटरबॉम्बची सीबीआयमार्फत चौकशी करून व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी याचिका अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत या पत्राच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here