जितेंद्र आव्हाडांवरील आरोपानंतर अंजली दमानिया संतप्त; म्हणाल्या, “तो व्हिडीओ १० वेळा पाहिला…

anjali-damania-on-ncp-mla-jitendra-awhad-over-mumbra-police-file-case-molestation-news-update
anjali-damania-on-ncp-mla-jitendra-awhad-over-mumbra-police-file-case-molestation-news-update

मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाकडून आव्हाड आणि कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यातच ७२ तासांच्या आताच जितेंद्र आव्हाडांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आव्हांडाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘एबीपी माझा’शी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, “अतिशय लाजिरवाणे आरोप होत आहेत. राष्ट्रवादी पक्ष किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी मला आस्था नाही आहे. पण, चुकीला चुकच म्हटलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचा तो व्हिडीओ मी १० वेळा पाहिला, त्यात कोणत्याही प्रकारे विनयभंगासारखी कृती घडली नाही. त्यामुळे महिलेने विनयभंगासारखे आरोप करणे खोटे आणि चुकीचं आहे.

“महाराष्ट्रात खालच्या स्तरावरील राजकारण सुरु आहे. विवियाना मॉलमधील प्रकरणाबद्दल बोलणार नाही. पण, आव्हाडांवर करण्यात आलले आरोप हेतूपुरस्कर आहे. नीच आणि गटार दर्जाचं राजकारण सुरु आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी ट्विट करत याप्रकरणावर भाष्य केलं आहे. त्या म्हणतात, “विनयभंग?… काय वाट्टेल ते आरोप?… जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा आहे,” असे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here