राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करुन अटक करा: अतुल लोंढे

मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचा दाखवून माथी भडकवण्याचा डाव.

Arrest Ashish Shelar for inciting riots in the state: Atul Londhe
Arrest Ashish Shelar for inciting riots in the state: Atul Londhe

मुंबई:राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोक्षक विधाने सातत्याने करत आहेत. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचे खोटे सांगून आशिष शेलारांनी जनभावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे अफवा पसरवून शेलार यांनी राजकीय फायद्यासाठी दंगल भडकवण्याचा प्रकार केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करुन आमदार आशिष शेलारांना अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटत चालला आहे. मोदी-शहांच्या द्वेषाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकातही काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव केल्याचे दुःख भाजपाला पचवता येत नाही. वर्षभरात महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका आहेत तसेच लोकसभा निवडणुकाही होत आहेत.

या निवडणुकांतही भाजपाचा पराभव होणार या भितीने ग्रासलेले भाजपातील आशिष शेलार सारखे नेते जनतेची माथी भडकवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांना आधार घेत आहेत. गोहत्येची चित्रफीत दाखवताना आशिष शेलार यांनी त्यांची खातरजमा करायला हवी होती. पण तसे न करता त्यांनी जाणीवपूर्वक ती चित्रफीत दाखवून जनतेमध्ये काँग्रेसविरोधी वातावरण बनवण्याचा हिन प्रकार केला आहे.

राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, अहमदनगर व त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम भाजपा व संलग्न संघटना करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त विरोधी पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करतात पण स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करत नाहीत.

राज्यात दंगली भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा हा डाव असून पोलीसांनी अशा प्रकारांना वेळीच आळा घालावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेटही घेतली होती. परंतु पोलीस चिथावणीखोर विधाने करणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई करताना दिसत नाहीत. राज्य सरकार व पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालावा, भाजपाचे असले प्रकार काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असेही लोंढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here