…पण या नोटा कत्तलखाने बारमध्येही जाणार, मग आपण काय करणार केजरीवालजी?; सचिन सावंतांचा सवाल

Manoj Jarange's language about Rahul Gandhi is highly condemnable, Jarange should observe limits while speaking: Sachin Sawant
Manoj Jarange's language about Rahul Gandhi is highly condemnable, Jarange should observe limits while speaking: Sachin Sawant

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi Cm) अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी भारतीय चलनावर गांधींजींचा फोटो आहे तो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावला जावा अशी अजब मागणी केली आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. पण सोबतच देवी-देवतांचे आशीर्वादही हवे आहेत”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केजरीवालांच्या मागणीनंतर प्रदेश काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी  केजरीवालांना काही सवाल केले आहे.

दरम्यान, या मागणीवर नेटिझन्सकडून वाद-विवाद सुरू असताना काँग्रेसकडून त्यावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “केंद्र सरकार आणि केजरीवाल देशवासीयांची फसवणूक करत आहे”, अशी टीका केली आहे.

 “कुबेरजींना सोडून दिलं का?”

या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केजरीवाल यांना खोचक प्रश्न केला आहे.”कुबेरजींना सोडून दिलं का? भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मीमाता कशा खूश राहणार? आणि नवग्रह? तुम्ही जय श्रीरामचा नारा देता आणि भगवान श्रीरामाला विसरलात? सीतामाता, हनुमानजी नसतील तर अर्थव्यवस्था कशी सुधारणार?” असे प्रश्न सचिन सावंत यांनी ट्विटरवर उपस्थित केले आहेत.

“पण या नोटा कत्तलखाने, मांसाहारी हॉटेल, मासळी बाजार आणि बारमध्येही जाणार. मग आपण काय करणार केजरीवालजी?” असाही प्रश्न सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला आहे.

 “हे जनतेला मूर्ख समजण्यासारखं आहे”

“२०१४नंतर भाजपा आणि आम आदमी पार्टीसारखे पक्ष देशात वैज्ञानिक दृष्टीकोनाऐवजी कट्टरतावाद पसरवून देशाला रसातळाना घेऊन जात आहेत. अर्थव्यवस्थेसारख्या क्लिष्ट प्रश्न नोटांवर देवतांचे फोटो लावल्याने सुटेल असं म्हणणं देशातील जनतेला मूर्ख समजण्यासारखं आहे. यावरून कळतं की नेहरू देशासाठी वरदान का होते”, असंही आपल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत म्हणाले आहेत.

काय आहे केजरीवाल यांची मागणी?

देशात सध्या चलनात असलेल्या नोटांविषयी केजरीवाल यांनी केलेली मागणी चर्चेचा विषय ठरली आहे. विशेषत: काँग्रेसकडून या मागणीला तीव्र विरोध करण्यात येत आहे. “परवा दिवाळी होती. आपण सर्वांनी गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. सुख आणि शांतीसाठी प्रार्थना केली. व्यापारी तसंच इतर सर्वजण लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवत असल्याचं आपण पाहतो. रोज सकाळी काम सुरु करण्याआधी त्यांची पूजा करतात. आज माझं केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना आवाहन आहे की, भारतीय चलनावर गांधींजींचा फोटो आहे तो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावला जावा. जसं मी म्हटलं की, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. पण सोबतच देवी-देवतांचे आशीर्वादही हवे आहेत”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here