आर्यन खान मुस्लीम असल्यानेच त्रास दिला जातोय – मेहबुबा मुफ्ती

aryan-khan-drugs-case-pdp-mehbooba-mufti-tweets-central-agencies-bjp-news-update
aryan-khan-drugs-case-pdp-mehbooba-mufti-tweets-central-agencies-bjp-news-update

जम्मू काश्मीर: क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan khan) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान आर्यन खानच्या अटकेवरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता त्याला धार्मिक रंगही मिळत आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी आर्यन खान अटकेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी आर्यन खानवरील कारवाईवरुन केंद्र सरकारवर टीका केली असून लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावरही निशाणा साधला आहे.

मेहबुबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर आरोप

मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, “चार शेतकऱ्यांच्या हत्येचा आरोपी असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कारवाई करुन उदाहरण देण्याऐवजी केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे. भाजपाच्या मतदारांना खूश करत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना टार्गेट केलं जातं ही न्यायाची विटंबना आहे”.

१३ ऑक्टोबरला जामिनावरील सुनावणी

आर्यन खानला कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याच्या जामिनावरील सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. यानुसार आता पुढील सुनावणी बुधवारी (१३ ऑक्टोबर) होणार आहे. सुनावणीदरम्यान आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी गर्दी होत असून त्यात करोनाशी संबंधित शारीरिक अंतराचं पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर न्यायालयाने केवळ ज्येष्ठ वकिलांनाच सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत.

विशेष म्हणजे आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन सरकारी वकील आणि अॅड. अमित देसाई यांच्याच खडाजंगी झाल्याचं दिसलं. देसाई यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्याची विनंती केली. मात्र, विशेष सरकारी वकील सेठना यांनी गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली. यानंतरही सेठना यांनी गुरुवारचा आग्रह केल्यानंतर देसाई यांनी त्यांना न्यायालयाचा थोडा आदर ठेवा, असं म्हणत टोला लगावला.

दरम्यान, याआधी आर्यन खानच्या जामिनावर मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर याचिका आली होती. तेव्हा न्यायालयाने जामिनावर सुनावणीचा अधिकार विशेष सत्र न्यायालयाला असल्याचं सांगत ही याचिका फेटाळली होती.

आर्यन खानसह ७ जणांना सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर ७ आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. याविरोधातच सध्या आर्यन खानकडून विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here