कर्नाटकमधील भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा;राज ठाकरेंची टीका

ashish-shelar-replied-to-raj-thackeray-over-criticism-of-bjp-after-karnatak-election-result-news-update-today
ashish-shelar-replied-to-raj-thackeray-over-criticism-of-bjp-after-karnatak-election-result-news-update-today

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली होती. तसेच कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा परिणामही दिसून आला, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले आशीष शेलार?

“घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?” अशी प्रतिक्रिया आशीष शेलार यांनी दिली.

पुढे बोलताना, “राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही,” असंही ते म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, आज अंबरनाथमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. या वेळी बोलताना कर्नाटकमधील भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव दिसला असून “जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा,” असंही राज ठाकरे म्हणाले. याबरोबरच कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here