औरंगाबाद:कोरोनाने पुन्हा सहा महिन्यांनंतर डोकेवर काढले आहे. रविवारी बजाजनगर परिसरातील चार वर्षीय मुलगी कोरोना बाधित असल्याचे समोर आले. या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र,यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा धडकी भरली आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण राज्यात थैमान घातले होते. जवळपास कोरोनाच्या तीन लाटा आल्या. त्यात या आजाराने अनेकांनी आपले नातेवाईक गमावले होते. यानंतर गेल्या सहा महिन्यांत शहर किंवा परिसरात एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला होता.
यादरम्यानच वाळूज परिसरातील बजाजनगरची सर्दीने त्रस्त असलेली चार वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली. तिला शनिवारी सायंकाळी उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ही चिमुकली कोरोनाबाधित आढळली. यानंतर ही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ धाव घेतली.
चिमुकली कोरोना बाधित असली तरी तिची प्रकृती स्थिर असून, तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या ती होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज कॉन्टॅक्टची तपासणी
संबंधित चिमुकली कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य विभागाचे पथक सोमवारी (ता. सहा) परिसरात जाऊन सर्वेक्षण करणार आहे. चिमुकलीच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील लोकांची तपासणी केली जाणार असल्याचेही जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
बाधा झाली कशी?
महापालिकेच्या पथकाने अधिक माहिती घेतली असता, मुलीचे आई-वडील किंवा घरातील कुणीही बाहेरगावी गेलेले नव्हते. बाहेरगावाची केस हिस्टरी नसताना, या चिमुकलीला कोरोनाची बाधा झाली कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या पथकाने ही माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिली.
मास्कचा वापर करावा…चिमुकली कोरोना बाधित आढळली असली तरी नागरिकांनी घाबरू नये. गर्दीसोबतच इतर ठिकाणीही मास्कचा वापर करावा.
डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद