मुंबई : औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Aurangabad City District Congress Committee) अध्यक्षपदी शेख युसुफ उर्फ युसुफ लिडर (Yousif Leader) यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे,प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, कैसर बाबा यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. नामांतर प्रकरणावरून हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसची अवस्था शहरात वाईट झाली होती.
औरंगाबाद नामांतर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हिशाम उस्मानी यांनी काँग्रेसच्या शहराध्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासह ३०० पदाधिका-यांनी राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठविले आहे. राजीनामासत्रानंतर शहर काँग्रेस कमिटीकडून एकही कार्यक्रम नाही. गांधी भवनाला ताळे लागले असून काँग्रेस ‘सायलेंट’ मोडवर असल्याचे चित्र होते.
सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. परंतु काँग्रेसमध्ये शहरात कोणतीही तयारी दिसत नव्हती. महागाई विरोधात कोणतेही आंदोलन झाले नव्हते. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ब-याच कार्यकर्त्यांनी तयार केली होती. परंतु नामांतराचे प्रकरण झाल्यानंतर इच्छूक कार्यकर्ते नाराज झाले आहे. त्यामुळे काँग्रेसला महापालिका निवडणुकीत उमेदवार मिळणेही कठीण होईल अशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु होती.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही शहराकडे दुर्लक्ष केले आहे. कोणतीही बैठक नाही. निवडणुकीची तयारी नाही. असे एकूण चित्र असल्यामुळे काँग्रेस फक्त नावापुरतीच उरली असल्याचे चर्चा होती.
नामांतरचा काँग्रेसला फटका….
शहराध्यक्षपदी हिशाम उस्मानी यांची गेल्या 18 महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. उस्मानी यांनी चांगले काम केले होते. संघटन मजबूत केले होते परंतु महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचा नामांतर प्रस्ताव मंजूर केले. त्यामध्ये काँग्रेसने समर्थन दिल्यामुळे उस्मानी यांच्यासह 300 पदाधिका-यांनी राजीनामे दिले होते. त्यांची पक्षश्रेष्ठींनी समजूत काढली परंतु त्यांनी नामांतराचा निर्णय आम्हाला मान्य नाही. समाजात कोणत्या तोंडाने आम्ही मते मागायची असा निर्णय दिल्ली दरबारी कळवला होता.