औरंगाबाद मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज होणारी आरक्षण सोडत रद्द!

शासनाच्या आदेशामुळे मनपा निवडणुका पुन्हा लांबणार

Aurangabad municipal election Friday's reservation draw is postponed news update today
Aurangabad municipal election Friday's reservation draw is postponed news update today

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी  (Aurangabad Municipal Corporation Election) शुक्रवारी होणारी आरक्षण सोडत शासनाच्या आदेशामुळे स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शुक्रवार (ता.पाच) ऑगस्टला संत एकनाथ रंग मंदिरात होणारी आरक्षण सोडत होणार नाही. त्यामुळे इच्छूकांचा हिरमोड झाला असून निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शासनाने प्रभाग रचना रद्द करून पूर्वी प्रमाणेच वॉर्ड रचनेनुसार महापालिकेच्या निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिका प्रशासन पेचात सापडले आहे. शुक्रवारी (ता. पाच) ऑगस्टला आरक्षणाची सोडत निघणार होती. बुधवारी त्याबाबत रंगित तालिम ही प्रशासनाने घेतली होती. मात्र गुरुवारी उशीरा शासनाकडून आदेश मिळाल्यामुळे आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (महापालिका) निवडणुका तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार घेण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यामुळे महापालिका क्षेत्रात आता पुन्हा ११५ वॉर्ड होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी सरकारने वाढीव लोकसंख्येचा विचार करून वॉर्डांची संख्या १२६ केली होती.

राज्य सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत २०१७ नुसार महापालिकेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय झाला. हा निर्णय करताना लोकसंख्येचा निकषदेखील ठरविण्यात आला. या निकषानुसार १२ लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेत ११५ वॉर्ड असतील, त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एक अतिरिक्त मनपा सदस्य असेल, असे नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा – औरंगाबादसह ९ महापालिकांमधील आरक्षण सोडत रद्द

महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १२ लाख २८ हजार ३२ एवढी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे १२ लाख ४० हजार हा आकडा पार होऊ शकत नाही. त्याचा परिणाम म्हणून औरंगाबाद महापालिकेसाठी ११५ वॉर्डच राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने वाढवलेले अकरा वॉर्ड आता रद्द होतील, असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here