औरंगाबाद : औरंगाबाद शहर आज पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. ही संतापजनक घटना आज सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. पैठणरोडवरील कांचनवाडी आनंद विहारमध्ये ही घटना घडली. आरती समीर म्हस्के (वय 25, रा.भाग्यनगर) निशांत समीर म्हस्के (वय अडिच वर्ष), अशी खून झालेल्या मायलेकाची नावे आहेत. तर समीर विष्णू म्हस्के (वय 30,रा. भाग्यनगर) असे खून करणा-या पतीचे नाव आहे.
रविवारी (दि. 8) रात्री पती पत्नीमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर गंभीर अशा भांडणात झाले. आणि पतीने पत्नीसह चिमुकल्यालाही संपवून टाकले. विशेष म्हणजे समीरने आरतीच्या ओरडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तिचा गळा आवळण्यापूर्वी तिच्या तोंडात कापडी बोळा कोंबल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे.
अशी घडली घटना
सातारा पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सातारा पोलिस ठाणे हद्दीत कांचनवाडी परिसरात समीर म्हस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. मात्र, दोघा पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असत. समीर हा नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून अनेकदा त्यांच्यात खटके उडत असत. दरम्यान काल रात्री झालेल्या अशाच वादानंतर समीर म्हस्के याने घरातील दोरी आणि मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगा निशांतची गळा आवळून हत्या केली.
फोन करून दिली माहिती
पत्नी व मुलाचा खून केल्यानंतर आरोपी समीरने स्वतः सातारा पोलिस ठाण्यात फोन करून आपण पत्नी व मुलाला ठार केले असून तुम्ही ताबडतोब घटनास्थळी यावे, अशी माहिती दिली. माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली असता सदरील घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी माय-लेकाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. तर आरोपी समीर म्हस्के याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात समीरच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.