प्रेयसीला अ‍ॅसिड,पेट्रोल टाकून जाळणा-या नराधमाला ठोकल्या बेड्या

पुण्यामध्ये दोघे एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते

Beed-acid-attack-accused-arrested-by-nanded-police
Beed-acid-attack-accused-arrested-by-nanded-police

बीड l बीड जिल्ह्यातील नेकनूर जवळ एका 22 वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून रविवारी सायंकाळी या आरोपीला पकडण्यात आले.

ॲसिड हल्ल्यात गंभीररित्या भाजलेल्या मुलीचा उपचारादरम्यान रविवारी दुपारी बीडच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अविनाश राजुरे ( रा. शेळगाव जि. नांदेड) असे ॲसिड हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत सावित्री आणि आरोपी अविनाश हे दोघेही देगलूरच्या शेळगावचे रहिवासी होते.

पुण्याहून परतताना बीड जिल्ह्यात केला होता अॅसिड हल्ला

आरोपी आणि सावित्री हे प्रेमीयुगुल पुण्याहून गावी परत येत होते. त्यावेळी अॅसिड हल्ल्याची ही धक्कादायक घटना घडली. देगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते. रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात मुक्कामासाठी थांबले होते. पहाटेच्या सुमारास अविनाशने तरुणीच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले. तसेच पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर त्याने गंभीर भाजलेल्या तरुणीला सोडून घटनास्थळावरुन पळ काढला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ॲसिड हल्ल्यानंतर आरोपीने गाठले देगलूर

आरोपी राजुरे याने शनिवारी रात्री उशिरा प्रेयसी सावित्रा हिच्यावर जिल्ह्यातील नेकनूरगावाजवळील मांजरसुंबा केज मार्गावर येळंब घाटात ॲसिड टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या ॲसिड हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मागील पंधरा तासांपासून नेकनूर पोलीस अविनाश राजुरे याचा शोध घेत होते.

ही करा l नितीश कुमारांचा सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी

धाब्यावरून अविनाशच्या आवळल्या मुसक्या 

पीडीतेने दिलेल्या जबाबानुसार आरोपी हा नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातल्या शेळगावचा रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी देगलूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. प्राप्त माहितीच्या आधारे देगलूर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनीही देगलूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या परिसरात पाठविली होती.

हेही वाचा l Tuljabhavani Temple l तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज 1 हजार पेड, 3 हजार मोफत दर्शन पास

या प्रकरणातील फरार आरोपी अविनाश रामकिशन राजुरे याला देगलूर तालुक्यातील आदमपूर येथे एका धाब्यावरुन पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या सर्व घटनेत पीडित सावित्रा हिचा उपचारादरम्यान रविवारी दुपारी बीडच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here