
पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या आदेशामुळे मराठा समाजात विभाजन होण्याची शक्यता असून, ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण होणार आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला. इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण द्यावे.
मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागली तर संसदेत काँग्रेस पाठिंबा देईल, अशी भूमिका चव्हाण यांनी शुक्रवारी घेतली. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तरपणे आपली सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.