Chicken biryani: ‘चिकन बिर्याणीमध्ये चिकनच नव्हते’, ग्राहक न्यायालयाचा हॉटेलला दणका!

हॉटेलने पाठविलेल्या पार्सल बिर्याणीमध्ये चिकनचे तुकडे नव्हते, त्यामुळे तक्रारदाराने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आणि हॉटेल चालकाला दंडही बसला.

bengaluru-man-sues-restaurant-after-serving-chicken-biryani-without-chicken-wins-compensation-news-update
bengaluru-man-sues-restaurant-after-serving-chicken-biryani-without-chicken-wins-compensation-news-update

चिकन बिर्याणीमध्ये Chicken Biryani चिकनचे पीस नाहीत किंवा चिकन कमी आहे, यावरून अनेक ठिकाणी वाद झाले. आपण हॉटेलमध्ये जेवणासाठी जातो, तेव्हा असे प्रकार आजूबाजूला झालेले पाहिले असतील. मात्र चिकन बिर्याणीत चिकनचे पीस नाहीत, हा मुद्दा न्यायालयापर्यंत जाऊ शकतो? यावर आपला सहज विश्वास बसणार नाही. पण बंगळुरूत अशी घटना घडली आहे. एका ग्राहकाने चिकन बिर्याणीची ऑर्डर दिल्यानंतर पार्सल आलेल्या चिकन बिर्याणीत चिकनच नसल्यामुळे सदर ग्राहकाने बंगळुरुच्या ग्राहक न्यायालयात दाद मागितली. सदर ग्राहकाला हॉटेलकडून बिर्याणीत चिकन पीस मिळाले नसले तरी ग्राहक न्यायालयाकडून न्याय मात्र नक्की मिळाला. पण त्यासाठी त्याला आठ महिन्यांची प्रतिक्षा पाहावी लागली.

काय आहे?

बंगळुरूच्या नगरभावी येथे राहणाऱ्या क्रिष्णप्पाच्या घरचा गॅस सिलिंडर संपल्यामुळे त्याने जवळच्या हॉटेलमधून चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली. बिर्याणी घरी आल्यावर क्रिष्णप्पा आणि त्याच्या पत्नीने पार्सलमधील बिर्याणी व्यवस्थित तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, बिर्याणीमध्ये फक्त भात असून चिकनचे पीस अजिबातच नाहीत. सदर घटना २ एप्रिल २०२३ रोजी घडली.

यानंतर संतापलेल्या क्रिष्णप्पाने हॉटेलमध्ये फोन करून त्यांनी फक्त बिर्याणीचा भात पाठवला असून त्यात चिकनचे तुकडे नसल्याचे सांगितले. बिर्याणीसाठी १५० रुपये मोजूनही चिकन नाही, अशी तक्रारही केली. हॉटेलमालकाने ३० मिनिटांच्या आत बिर्याणीचे दुसरे पार्सल पाठवून देऊ, असे आश्वासन दिले. मात्र दोन तास वाट पाहूनही हॉटेलमधून पार्सल आले नाही. त्यामुळे क्रिष्णप्पा आणि त्याच्या पत्नीला त्या रात्री फक्त बिर्याणीचा भात खावा लागला.

हॉटेल मालकाने दिलेल्या वागणुकीमुळे संतापलेल्या क्रिष्णप्पाने त्यांना पुन्हा जाब विचारला, पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी २८ एप्रिल २०२३ रोजी क्रिष्णप्पाने हॉटेल मालकाला कायदेशीर नोटीस पाठविली. मात्र त्यालाही हॉटेल मालकाने प्रतिसाद न दिल्यामुळे शेवटी क्रिष्णप्पाने बंगळुरुच्या शांतीनगर येथील शहर ग्राहक न्यायालयात धाव घेऊन हॉटेल चालकाविरोधात मनस्ताप दिल्याचा खटला दाखल केला आणि ३० हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली.

क्रिष्णप्पाने स्वतंत्र वकील न करता, स्वतःच हा खटला लढवला. मात्र हॉटेल चालकाने न्यायालयात येण्याचीही तसदी घेतली नाही. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी न्यायालयाने नमूद केले की, हॉटेल व्यवस्थापनामुळे तक्रारदार क्रिष्णप्पा आणि त्याच्या पत्नीला मनस्ताप सहन करावा लागला.

पुरावा म्हणून बिर्याणीचे फोटो

तक्रारदार क्रिष्णप्पाने पुरावा म्हणून बिर्याणीचे फोटो न्यायालयात दाखविले. त्यातून हॉटेकडून कळत-नकळत चूक झाल्याचे निदर्शनास आले. न्यायालयाने नमूद केले की, तक्रारदाराने बिर्याणीचे पैसे देऊनही त्यांना हवे असलेले अन्नपदार्थ दिले गेले नाहीत. हे अन्यायपूर्वक आहे. यामुळे न्यायालयाने हॉटेल चालकाला १००० रुपयांचा दंड ठोठावला आणि तक्रारदाराचे १५० रुपये परत करण्यास सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here