भाजपमध्ये उध्दव ठाकरेंचे आव्हान स्वीकारण्याची हिंमत नाही; विद्या चव्हाणांचा हल्लाबोल

महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन छेडणार..

BJP has no guts to accept Uddhav Thackeray's challenge; Vidya Chavan's attack
BJP has no guts to accept Uddhav Thackeray's challenge; Vidya Chavan's attack

औरंगाबाद : शिवसेनेला (ShivSena) संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून (BJP) सुरू आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर आपण चुकत असेल, तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. मात्र, हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी दिले. मात्र, भाजपमध्ये उध्दव ठाकरेंचे आव्हान स्वीकारण्याची हिंमत नाही. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विदया चव्हाण (Vidya Chavan) यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना केला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा गुरुवारी औरंगाबादेत संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या धोरणावरून सवाल उपस्थित केले. देशात महागाईने थैमान घातले आहे. आज सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. बेरोजगारी वाढली आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन मोदी सत्तेत आले. परंतु तरुणांना ते नोकरी देऊ शकले नाही. महागाईवर अंकूश आणू शकले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता आज हैराण झालेली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.प्रा.फौजिया खान,राष्ट्रीय सचिव तथा समन्वयक आशा मिरगे,आशा भिसे, जिल्हाध्यक्षा छाया जंगले, शहराध्यक्षा मेहराज पटेल, शकीला खान, मंजुषा पवार यांची उपस्थिती होती.

शिंदे,फडणवीसांचे दुर्लक्ष...शेतकरी, महिला, नोकरदार, व्यापारी सर्वजण त्रस्त आहेत. राज्यात कोणतेही विकासात्मक काम नाही.शिंदे फडणवीस दिल्ली दरबारी मुजरा करण्यात व्यस्त आहेत. त्यांचे राज्याकडे लक्ष नाही. तत्कालीन आघाडी सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला सवलती देऊनही मोदी, शिंदे सरकारने तो प्रकल्प गुजरातमध्ये पळविला. त्यामुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तरुणांचा रोजगार हिरावून घेतला आहे. 

संबित पात्रा विकृत… संबित पात्रा हा विकृत असून त्याला धार्मिक तेढ निर्माण करणे एवढेच काम आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कधी टी शर्ट वरून कधी लहान चिमुकल्यांचे फोटो टाकून विखारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करतात. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत.

ईडी-सीबीआईचा गैरवापर…केंद्र सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करुन विरोधकांना खोटे नाटे आरोप केले जात आहे. शिंदे गटावर ईडीच्या कारवाया झाल्यानंतर ते भाजपसोबत गेल्यामुळे ते स्वच्छ झाले. ते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. भावना गवळींवर आरोप केले. चौकशी झाली. परंतु त्या नरेंद्र मोदी आता भावना गवळींच्या हस्ते राखी बांधून घेतात. हा सर्व प्रकार जनता डोळ्याने पाहात आहे. ईडीचा गैरवापर करुन माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर कारवाया करण्यात आल्या. त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. असे ही विदया चव्हाण म्हणाल्या.

महागाईविरोधात राष्ट्रवादी राज्यव्यापी आंदोलन छेडणार…महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहेत. आज शेतकरी, तरुण, गृहीणी सगळेच मोदी सरकारच्या धोरणांमुळे त्रस्त आहेत. महागाईमुळे जगणे अवघड झाले आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा उभारेल. असेही विद्या चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा: शिंदे सरकारकडून मुस्लिम समाजाच्या स्थितीचा आढावा नव्हे नौटंकी – विद्या चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here