उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस!;भाजपचा हल्लाबोल

kirit-somaiya-targets-cm-uddhav-thackeray-government-maha-vikas-aghadi-in-maharashtra-at-kolhapur
kirit-somaiya-targets-cm-uddhav-thackeray-government-maha-vikas-aghadi-in-maharashtra-at-kolhapur

मुंबई l शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार (Uttar Pradesh Assembly Election 2022) असल्याची घोषणा केली आहे. शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिलेत. यासंदर्भातील एक पत्रकच शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी जारी केलं आहे. मात्र आता याच विषयावरुन भाजपा नेते किरीट सोमय्यांनी (kirit Somaiya) शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thaceray) टोला लगावलाय.

मुंबईमध्ये सोमय्या यांनी लोकायुक्तांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाची माहिती देण्यासाठी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. परिवहनमंत्री अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याचे आदेश देण्यात आले असून  लोकायुक्तांसमोर न्यायालयामध्ये ठाकरे सरकारनेच परब याच्या कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिल्याचं सोमय्या यां नी म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेमध्ये त्यांना शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सोमय्या यांनी या सर्व घोषणा राज्यातील घडामोडींवरुन लक्ष्य विचलीत करण्यासाठी केल्या जात असल्याचा दावा केला.

यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होण्याबरोबरच काही उमेदवारांना १०० मतंही पडली नव्हती असा टोला सोमय्या यांनी लगावला. तसेच पुढे हसत त्यांनी, “उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा,” असंही म्हटलं.

Uttar Pradesh Assembly Election 2022 l भाजपाला धडा शिकवण्यासाठी शिवसेना सर्व मतदारसंघांमधून उमेदवार देणार!

शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भातील माहिती देणारं पत्रक जारी करतानाच या पत्रकामधून शिवसेनेनं उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका केलीय. राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात निर्माण झाल्याचं सांगतानाच भाजपाला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

१० सप्टेंबर रोजी लखनऊमधील हरतगंज येथे पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि पक्षाची वाटचाल कशी असणार यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे प्रमुख नेते ठाकूर अनिल सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना उत्तर प्रदेश सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था सक्षम नसल्याची परिस्थिती आहे, अशी टीका केलीय. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरु असून महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याची टीका ठाकूर यांनी केलीय.

शिवसेनेने जारी केलेल्या पत्रामध्ये, सरकार ब्राह्मणांविरोधात गैरव्यवहार करत आहे. राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती फारच वाईट आहे. करोना रुग्णांचे मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी सामान उपलब्ध होत नव्हतं अशी परिस्थिती आहे. बंद असणाऱ्या शाळाही राज्यामधील विद्यार्थ्यांकडून हव्या तशा पद्धतीने फी घेताना दिसत आहेत. सरकार शिक्षणसम्राटांच्या बाजूने आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यालयांमधील फी १५ टक्क्यांनी कामी करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने कायदा बनवून विद्यार्थ्यांना १५ टक्के फी सवलत दिलीय. उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारी आणि महागाईमुळे तरुण मुलं राज्य सोडून जात आहेत. सरकार शेतकरी आणि तरुणांसोबत सावत्र असल्याप्रमाणे व्यवहार करत आहे, असे आरोप करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.

पुढे याच पत्रकामध्ये, शिवसेना उत्तर प्रदेशमधील जनतेचा आवाज बनून त्याच्यामध्ये जाणार. शिवसेना सर्व जागांवर उमेदावर उतरवून भाजपाला धडा शिकवणार आहे. सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्ष बांधणीसाठी समन्वयक नियुक्त करण्यात आलेत. लवकरात लवकर उत्तर प्रदेशमधील शिवसेना नेत्यांचं एक प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन या निवडणुकीसंदर्भात अहवाल त्यांना सादर करणार आहे, असं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here