सिंधुदुर्ग: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले गेल्या काही दिवसांपासून राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली होती. राज्य सरकारला कुठलाही अल्टिमेटम दिलेला नाही, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. ‘७ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा असतो. त्याआधी सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा इतकीच अपेक्षा आहे,’ असं ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता संभाजीराजे यांनी आज यावर खुलासा केला. ‘मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमलं आहे. हे सगळं असलं तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणं चुकीचं नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील,’ असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी चार वेळा विनंती करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट नाकारल्यानं खासदार संभाजीराजे पंतप्रधान मोदी व भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. संभाजीराजे भाजपपासून दूर जात असल्याचीही चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज आपली भूमिका मांडली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे गेल्या काही दिवसांपासून राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली होती. मोदींनी चर्चेसाठी भेट न दिल्याचा संदर्भ त्यास होता. संभाजीराजेंच्या या टीकेनंतर भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्यावर पलटवार केला होता. विशेषत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंविरोधात आघाडी उघडली होती.
चारदा भेट नाकारल्याचं सांगता, पण त्याआधी ४० वेळ भेट दिल्याचं का सांगत नाही, असा सवाल पाटील यांनी केला होता. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा विरोध नाही, मात्र राज्य सरकारविरोधात संघर्ष न करण्याच्या त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे, असं पाटील म्हणाले होते. त्यामुळं संभाजीराजे भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या होत्या.
मोदींनी भेटीसाठी वेळ न दिल्याचा सल मनात आहे का, असं विचारलं असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. ‘पंतप्रधान मोदी मला उद्याही भेटीसाठी वेळ देऊ शकतात. पण हा वैयक्तिक भेटीचा प्रश्न नाही. समाजाचा विषय आहे. सगळ्या खासदारांना घेऊन मला त्यांना भेटायचं आहे,’ असं संभाजीराजे म्हणाले.
हेही वाचा: EPFO खातेदारांसाठी १ जूनपासून PF अकाऊंटवर लागू होणार ‘हे’ नियम
राज्य सरकारला कुठलाही अल्टिमेटम दिलेला नाही, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. ‘७ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा असतो. त्याआधी सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा इतकीच अपेक्षा आहे,’ असं ते म्हणाले.