
मुंबई:शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेल्या १६ सदस्यांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने Election commission पक्ष आणि चिन्हावर निकाल देण्यात घाई केली आहे. आयोगाचा हा निकाल अन्यायकारक असून केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करावा आणि त्यावरील नियुक्त्या निवडणुकीच्या माध्यमातूनच करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी केली. त्यांच्या या मागणीला भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे एकप्रकारे भाजपाला घरचा आहेर मिळाल्याचं बोललं जात आहे.
भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे कायमच त्यांची विविध विधानं तसेच भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या भूमिका, त्यांची विधानं ही त्यांच्याच पक्षाच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे दिसून आले आहे. एवढच नाहीतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही त्यांनी अनेकदा परखड मत व्यक्त केलेलं आहे. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या निर्णयासही त्यांनी पाठिंबा दर्शवल्याने, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
”मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण, त्यांचा कार्यकाळा अर्थमंत्रालयात संशायस्पद होता.” असं सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा करीत निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाची मागणी केली होती.
I support Uddhav Thakre demand to sack the CEC since his tenure earlier in Finance Ministry was dubious
— Subramanian Swamy (@Swamy39) February 21, 2023
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्याच आठवडय़ात शिंदे यांची मागणी मान्य करीत शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर पक्षपातीचा आरोप केला. निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली.
पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणे हा विरोधकांचा पूर्वनियोजित कट असून अशीच परिस्थिती उद्या अन्य पक्षांवरही आणू शकतात. त्यामुळे सन २०२४ची लोकसभा निवडणूक ही देशातील कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.