औरंगाबाद: भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हिंदू धर्मासाठी आचार्य शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न विचारून शंकराचार्य व तमाम हिंदूंचा अवमान केला. याप्रकरणी भाजपने हिंदू धर्मीयांची माफी मागत राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे (Congress) क्रांतिचौकात रविवारी आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे Narayan Rane आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे. याला शंकराचार्य येणार नसल्याने सांगितल्यानंतर राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या आंदोलनात इक्बालसिंग गिल, अनिस पटेल, डॉ. अरुण शिरसाठ, जिल्हा महिला अध्यक्षा हेमा पाटील, मोहन देशमुख, डॉ. नीलेश आंबेवाडीकर, शीलवंत गोपनारायण, अनिता भंडारी, मंजू लोखंडे, सागर नागरे, अनिल माळोदे, उमाकांत खोतकर, मुदस्सीर अन्सारी, आसमत खान, रवी लोखंडे, सुभाष देवकर, श्रीकृष्ण ककडे, बाबूराव कवसकर, शकुंतला साबळे, चंद्रप्रभा खंदारे, सविता म्हस्के, माधवी चंद्रकी, विद्या घोरपडे आदींनी सहभाग घेतला.
राणेंची मंत्रिमंडळातू हकालपट्टी करा…
हिंदू धर्माचे चार शंकराचार्यांशी चर्चा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ तारखेला आयोध्येत इव्हेंट ठेवला आहे. राणे शंकराचार्यांच्या विरोधात बोलत आहेत. राणेंनी समस्त हिंदू समाजाचा अपमान केला आहे. राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. शेख युसूफ, अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी