भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न!; सचिन सावंतांचा आरोप

arvind-kejriwal-cm-Delhi-on-currency-note-goddess-photos-congress-leader-sachin-sawant-slams-bjp-aap-news-update-today
arvind-kejriwal-cm-Delhi-on-currency-note-goddess-photos-congress-leader-sachin-sawant-slams-bjp-aap-news-update-today

मुंबई l कोरोना महामारीचे संकट अजून संपलेले नाही, राज्य सरकारने धार्मीक कार्यक्रम, जत्रा, यात्रा यावरील निर्बंध अद्याप उठवलेले नसताना पंढरपूरची आषाढी वारी पायी होऊ देण्याचा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीने धरला आहे. वारकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. राजकारण व अध्यात्म परस्परविरोधी मार्ग आहेत. भाजपा या अधर्माचा अध्यात्माशी संबंध काय? भाजपा अध्यात्मिक आघाडी BJP’s spiritual front या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम व भोंगळवाद स्थापित करण्याचे काम भाजपा BJP करत आहे. अनाचार्याच्या भाषेचा अध्यात्माशी दूरचाही संबंध नाही. धर्माच्या राजकारणासाठी चाललेले हे थोतांड भाजपाने तात्काळ बंद करावे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत Sachin Sawant यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपाचा हिंदू धर्मातील तत्त्वांशी संबंध नाही तर भाजपा अध्यात्मिक आघाडीचा अध्यात्माशी संबंध नाही. तसेच यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नाही. हे सर्व असत्याचे पुजारी आहेत. पायी वारीबद्दल होत असलेली मागणीमागे राजकारण आहे. हे लोक वारकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत तसेच त्यांना वारकऱ्यांच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही.

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत वारी करतात परंतु मागील वर्षापासून कोरोनाचा धोका आणि लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने त्यावर निर्बंध घातले आहेत. मागील वर्षी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत वारी सोहळा साजरा करून परंपरा खंडित होऊ दिली नाही. वारीमध्ये केवळ वारकरी नव्हे तर भाविकही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. त्यामुळे याही वर्षी राज्य सरकार वारकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेईल. 

हेही वाचा : Twitter मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, आता भाजपचा विरोध का?;शिवसेनेचा सवाल

परंतु पायीच वारी करा असा आग्रह करून वारकऱ्यांचे तसेच स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा या मंडळींचा उद्योग दिसत आहे. ‘मंदीर उघडा’ यासाठी राज्यात आंदोलन करुन शांतता बिघडवण्याचे काम याच मंडळींनी केले होते. कुंभमेळ्याला परवानगी देऊन हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला गेला हे सर्वांनी पाहिले आहेच. हाच खेळ महाराष्ट्रात खेळायचा आणि कोरोनाने काही अघटीत घडले की हेच लोक सरकारच्या नावाने बोंब मारायला पुन्हा मोकळे, अशी या लोकांची प्रवृत्ती आहे.

योगी, साध्वी, बाबा व स्वामी इत्यादी विशेषणे ही हिंदू धर्मात अत्यंत आदरणीय आहेत. स्वतःला मायेपासून, काम, क्रोध, लोभ आणि द्वेषापासून मुक्त करुन समाजाला अध्यात्माकडे घेऊन जाणारे हे लोक असतात. भाजपा आणि संघाने अशी विशेषणे लावणाऱ्या बोगस लोकांना पदे देऊन हिंदू धर्माचा अवमान केला आहे.

भाजपा अध्यात्मिक आघाडी नावाच्या प्रकाराने भाजपाने हिंदू धर्माचे विकृतीकरण करण्याचे व सत्तेच्या राजकारणासाठी अध्यात्म या ईश्वर प्राप्तीच्या वैयक्तिक मार्गाला व पवित्र संकल्पनेला बदनाम करण्याचे पाप केले आहे. अशा लोकांपासून जनतेने सावध व्हावे आणि त्यांचा कुटील हेतू साध्य होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही सावंत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here