औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज मंदिर उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. खडकेश्वर मंदिरात जाऊन ते पुजा-यांना निवेदन देणार होते. परंतु पोलीस आयुक्तांनी मंदिर उघडायला आल्यास कारवाई करु असा इशारा दिल्यानंतर एमआयएमला आंदोलन मागे घ्यावे लागले.
खडकेश्वर मंदिर परिसरात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. सकाळपासूनच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी खडकेश्वर मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावला होता. देशभरात अनलॉकचा चौथ्या टप्प्या सुरु आहे. यामध्ये धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. तरीसुध्दा एमआयएमने मंदिरं-मशिदी उघडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन 27 ऑगस्टला ठाकरे सरकारला दिले होते. “जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी काल पंढरपूर येथे आंदोलन केलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांसह एक हजारापेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
इम्तियाज जलिल यांचा बुधवारी मशिदीमध्ये नमाज अदा करण्याचा इशारा
बुधवारी आम्ही मशिद उघडणार. मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करु असा इशारा खा. इम्तियाज जलील यांनी दिला. मंदिर उघडण्यासाठी आम्ही आजचे आंदोलन मागे घेतले. दोन दिवसानंतर पुन्हा आंदोलन करु असाही इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.