
मुंबई: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (shubhangi patil) यांचा पराभव झाला. पराभवानंतर मला झाशीच्या राणीसारखं लढायचं होतं, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली. शुभांगी पाटील यांच्या या प्रतिक्रियेवर भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी खोचक शब्दातं टीका केली. त्यानंतर भातखळकर यांना काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीटद्वारे जशास तसे उत्तर दिले आहे. सावंत यांनी अभिनेत्री कंगना रणौतचा उल्लेख करत भातखळकर यांच्यावर टीका केली आहे.
अतुळ भातखळकर काय म्हणाले होते?
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. “मी झाशीच्या राणीच्या पायाची धूळही नाही. पण झाशीची राणी लढली तसं मला लढायचं होतं. एक मोठी धनसंपत्ती, अगदी अब्जोमध्ये आणि मी तर झोपडी होते. तो तर फार मोठा बंगला होता. पण झोपडीनेही तिचे पाय पक्के रोवून ठेवले होते. ४० हजार मतं मला मिळाली,” असे शुभांगी पाटील म्हणाल्या होत्या.
हा महाराष्ट्राचा अपमान नाही का लाचारांनो?
शुभांगी पाटील यांच्या याच विधानावर अतुल भातखळकर यांनी शुभांगी पाटील यांनी स्वत:ची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी तुलना केल्याचा आरोप केला होता. “स्वतःच स्वतःची तुलना राणी लक्ष्मी बाईंशी करणे, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का लाचारांनो?” असा सवाल भातखळकर यांनी ट्वीटद्वारे केला होता.
सचिन सावंत यांचे अतुल भातखळकर यांना उत्तर
अतुल भातखळकर यांनी केलेल्या खोचक टिप्पणीला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शेलक्या शब्दांत उत्तर दिले आहे. त्यांनी अतुल भातखळकर यांचे ट्वीट रिट्वीट करून कंगना रणौतचा उल्लेख केला आहे. ‘भाजपासाठी कंगना रणौत झाशीची राणी आहे, हे राम कदम यांनी स्पष्ट केलेले आहे. नाही का?’ असे सावंत म्हणाले आहेत.