मुंबई, दि. २२ नोव्हेंबर २०२४ : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदाही काँग्रेस महाविकास आघाडीलाच होईल. मविआला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे त्यामुळे त्रिशंकु विधानसभेचा प्रश्न उद्भवत नाही. निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेस पक्षाने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे का, यावर बोलताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीतही पक्षासोबत राहिले आहेत त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही, असेही चेन्नीथला म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर रमेश चेन्नीथला म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील.