
नांदेड: भारतात कॉलेज, रुग्णालय, धरणे, कारखाने, सहकारी संस्था या काँग्रेसने उभ्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आठ ते नऊ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी उभारलेली एकतरी संस्था अथवा प्रकल्प दाखवावा. मात्र, काँग्रेसला शिव्या दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. झोपेतून उठलं की देवाची पूजा करण्याऐवजी, काँग्रेसला शिव्या कशा द्यायच्या याची शिकवण घेतात. त्यामुळे तुम्हाला शिव्या देणारे लोक पाहिजेत, की देशसेवा करणारे पाहिजेत, असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष (President of Indian National Congress) मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी मराठीतून विचारला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी नांदेड येथील ‘भारत जोडो यात्रे’त मराठीतून भाषण केलं. त्यामुळे सभागृहावर असणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा अवाक झाले.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “राहुल गांधींना काँग्रेसच्या अध्यपदाबाबत विचारण्यात आलं. पण, त्यांनी लोकांची सेवा करायची असल्याचं सांगतं अध्यक्षपद नाकारले. सोनिया गांधी यांनी सुद्धा युपीए सरकारच्या काळात पंतप्रधान पदाला नकार दिला. मला पंतप्रधान व्हायचं नाहीतर, गरीब लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करावे. अन्यथा सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष मंत्रीपद नाही मिळालं तर, सोडून जातात किंवा मुख्यमंत्रीपदासाठी भांडण करतात.”
“लोकांना मोदी, मोदीचा कंटाळा आला आहे. पंतप्रधान मोदी देशाबाहेर गेल्यावर मोदी, मोदी करणारे ५०० ते ६०० लोक असतात. या लोकांना आम्ही इंजिनीअर, डॉक्टर आणि प्राध्यापक केलं. हे सर्व डॉक्टर, इंजिनिअर आठ वर्षात झाले नाहीत. तरीही पंतप्रधान काँग्रेसने काय केलं विचारतात. आम्ही संविधान वाचवलं नसते, तर तुम्ही पंतप्रधान झाले नसता. तरीही पंतप्रधान विचारतात तुम्ही काय केलं. मात्र, पंतप्रधानांनी फक्त जुमलेबाजी केली. १५ लाख रुपये, वर्षाला २ कोटी नोकऱ्या कुठे आहेत,” असा सवालही मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.