
बुलढाणा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे कोश्यारी औरंगाबादेत बोलताना म्हणाले. कोश्यारी यांच्या या विधानानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. कोश्यारी यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता काँग्रेसनेदेखील (Congress) भाजपा (BJP) आणि कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाने तसेच कोश्यारी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली.
“राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. ते कधी महात्मा जोतिबा फुले तर कधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात. आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे गडकरी यांना त्यांच्याच पक्षाने राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले होते. शिवाजी महाराज यांची गडकरी यांच्याशी तुलना करण्यात आली. आज केंद्रातील भाजपाच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक टिप्पणी केली,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.
“औरंगजेबाला मुजरा करणार नाही, अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतली होती. भाजपाला हे माहिती नाही का? शिवाजी महाराज शरणागती पत्करणारे नव्हते. पण त्यांचा भाजपा अवमान करत आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच महाराष्ट्रील जनतेची जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रत फिरू देणार नाही,” अशी भूमिकाही नाना पटोले यांनी मांडली.
काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (१९ नोव्हेंबर) औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेदेखील कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना, “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की, तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना आम्ही रस्त्यावरही फिरू देणार नाही! pic.twitter.com/TcyRgf4fan
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 19, 2022
धांशू त्रिवेदी यांचे आक्षेपार्ह विधान
भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबला पत्र लिहिलं होतं. त्या काळात राजकीय अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक लोकं माफीनामा लिहायचे, असे विधान त्रिवेदी यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.