औरंगाबाद: दिल्ली येथून पळून आलेलं प्रेमीयुगुल समृद्धी महामार्गावरून पायी जात असताना तामिळनाडूच्या मालवाहू ट्रकने दोघांना चिरडले. या अपघातात २० वर्षीय तरुण आणि १३ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १७ जानेवारी रोजी सावंगी भागात घडली होती. पोलिसांनी दोघांच्या पालकांना या बाबत कळवलं. मात्र दोन दिवस उलटूनही पालकांनी मृतदेह ताब्यात घेतलेले नाहीत. त्यामुळे दोघांचे मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
असीम उर्फ बुच्चन अब्बास असं मुलाचं नाव आहे. तर मुलगी अल्पवयीन आहे. १७ जानेवारीच्या रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावंगी परिसरातील समृद्धी महामार्गावर असीम आणि अल्पवयीन मुलगी पायी जात होते. दरम्यान सावंगी पुलाजवळ त्यांना तामिळनाडूच्या मालवाहू ट्रकने चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेच्या मदतीने दोघांना औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी दोघांची ओळख पटवली असता दोघेही दिल्लीतील असल्याची माहिती मिळाल्याने फुलंब्री पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता दोघेही घरातून पळून आल्याची माहिती समोर आली. तशी नोंद दिल्ली पोलिसात असल्याची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या मदतीने दोघांच्या पालकांचा शोध घेत त्यांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. मात्र घटनेला दोन दिवस उलटले असतानादेखील मृतांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे.
अपघात की हत्या?
दोघेही दिल्लीहून पळून आल्यावर औरंगाबादमध्ये कुणाकडे आले होते का? दोघे महामार्गावर काय करत होते? ते कुठे चालले होते? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेले नाहीत. रस्ता ओलांडताना दोघांचा अपघात झाला की त्यांनी आत्महत्या केली की कुणी त्यांची हत्या केली. याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.