लोकसभा निवडणुकीत धर्मांधशक्तींचा पराभव करुन धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार आणा

माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे आवाहन; टिळक भवनमध्ये काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा.

Defeat the bigoted forces in the Lok Sabha elections and bring a government of secular ideas says Bhalchandra Mungekar
Defeat the bigoted forces in the Lok Sabha elections and bring a government of secular ideas says Bhalchandra Mungekar

मुंबई: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व स्वातंत्र्यानंतर जगात महाशक्ती म्हणून उभे करण्यात काँग्रेस (Congress) पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. परंतु मागील १० वर्षात धर्मांधशक्ती सत्तेत आल्यापासून देशासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. धर्मांधशक्ती देशाचे संविधानच मोडीत काढण्यास निघाली आहे. लोकशाही, संविधान व देशासमोरचा हा धोका ओळखून आगामी लोकसभा निवडणुकीत या जातीयवादी, धर्मांध शक्तींचा पराभव करुन धर्मनिरपेक्ष विचारांची सरकार आणावे, असे आवाहन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर  (Dr. Bhalchandra Mungekar) यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन करताना डॉ. मुणगेकर म्हणाले की, आजच्याच दिवशी १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची मुंबईत स्थापना झाली व पुढे स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाने मोठा लढा दिला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस आदी महत्वाच्या नेत्यांनी संघर्ष करुन देश स्वतंत्र केला. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांतील ५८ वर्षे काँग्रेस पक्ष सत्तेत होता. या काळात पंडित नेहरु, लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंह यांनी देशात वैज्ञानिक, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात प्रगती करुन देशाला समृद्ध केले. सर्व जातीधर्मांचा देश एकोप्याने राहतो हीच भारताची खरी ओळख आहे पण मागील काही वर्षांत याला छेद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मसत्ता व राज्यसत्ता एकत्र करून देशाची ओळख संपवली जात आहे हा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून सर्वांनी या शक्तींचा पराभव करणे गरजेचे आहे असे आवाहन करून डॉ. मुणगेकर यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना काँग्रेस स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, राजेश शर्मा, माजी आमदार सुभाष चव्हाण, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवजी सिंग, राजाराम देशमुख, गजानन देसाई, अजिंक्य देसाई, विनय राणे, दिनेश सिंग यांच्यासह काँग्रेस व सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here