नवी दिल्ली: दिल्लीमधील करकरडूमा कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. करकरडूमा न्यायालयाने (Karkardooma Court) आरोपी उमर खालिदला एका आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायलयाने आज (सोमवार) जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला (Umar Khalid) २०२० मध्ये ईशान्य दिल्लीतील दंगलीच्या मोठ्या षडयंत्र प्रकरणात एका आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बहिणीच्या लग्नासाठी उमर खालिद याने न्यायालयासमोर अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी आदेश देताना स्पष्ट केले की, अंतरिम जामीन हा सशर्त असणार आहे. अंतरिम जामीन २३ डिसेंबरपासून सुरू होईल आणि आदेशानुसार खालिदला ३० डिसेंबर रोजी हजर व्हावे लागेल. वरिष्ठ वकील त्रिदीप पाइस यांनी खालिची बाजू मांडली आणि दिल्ली पोलिसातर्फे सरकारी वकील अमित प्रसाद होते.
खालिदच्या जामीन अर्जाल विरोध दर्शवत दिल्ली पोलिसांनी दावा केला होता की, तो त्याच्या सुटकेच्या काळात सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवू शकतो आणि यामुळे समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांनी हेदेखील सांगितले की, खालिदचे आई-वडील सर्व आवश्यक व्यस्था करण्यास सक्षम आहेत, कारण त्याची एक बुटीक चालवते आणि त्याचे वडील एका राजकीय पक्षाचे नेतृत्व करत आहेत.