मुंबई: भाजपाकडून आगामी निवडणुकींसाठी राज्यात मोर्चेबांधणी करण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने ‘मिशन महाराष्ट्र’ (Mission Baramati) असा नारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीबाबत भाष्य केले आहे.
“आमचे मिशन इंडिया, मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते. त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती देखील आहे” असा टोला फडणवीसांनी पवारांना लगावला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) तिनदा निवडून आल्या आहेत.
बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करू, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी बारामती दौऱ्यावर असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता फडणवीसांनीही भाजपाचे मनसुबे बोलून दाखवले आहेत. दरम्यान, भाजपा नेत्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपाला होत आहे, असा टोला पाटलांनी भाजपाला लगावला आहे. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे,” असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.