राज ठाकरेंशी युतीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य; म्हणाले, “हिंदुत्वाच्या मुद्यावर आमचे विचार जुळतात परंतु…”

devendra-fadanvis-on-mns-supremo-raj-thackeray-alliance-says-we-agree-on-hinduism-news-update-today
devendra-fadanvis-on-mns-supremo-raj-thackeray-alliance-says-we-agree-on-hinduism-news-update-today

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अलिकडच्या काळात अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील वारंवार राज यांना भेटत असतात. या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या युतीची चर्चा अधून-मधून पाहायला मिळते. दरम्यान, इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झालेले भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना या नव्या युतीबद्दल प्रश्न केला असता, त्यांनी सांगितलं की, हिंदुत्वाच्या मुद्यावर आमचे विचार जुळतात हे खरं आहे, परंतु अद्याप युतीची कोणतीही चर्चा झालेली नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना तुम्ही सारखे भेटत आहात, तुमची त्यांच्यासोबत युती होणार आहे का? असा सवाल केल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे आमचे जुने मित्र आहेत. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांचं राजकारण संकुचित होतं. महाराष्ट्रात मराठीबद्दल बोलणं योग्यच आहे, मराठीचा मुद्दा मांडलाच पाहिजे, परंतु ते करत असताना इतरांना विरोध करू नका, अशी आमची भूमिका होती. देशाची भाषेच्या आधारावर विभागणी होऊ नये असं आम्हाला वाटतं.

हेही वाचा: “राष्ट्रवादीच्या नेत्यांवर एकनाथ शिंदेसारखाच प्रयोग सुरू…”, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

 देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलिकडच्या काळात राज ठाकरे यांनी केवळ भाषेचा मुद्दा सोडून व्यापक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. हल्ली ते हिंदुत्वाबद्दल बोलतात. ही गोष्ट आम्हाला जोडणारी आहे. परंतु आमच्यात युतीची कोणतीही चर्चा नाही, ही गोष्ट मी याआधीही स्पष्ट केली आहे.

 “हिंदुत्वाच्या विषयावर आमचे विचार जुळतात”

फडणवीस म्हणाले की, हिंदुत्वाच्या विषयावर आमचे विचार जुळतात हे खरं आहे. परंतु आमची आधीपासूनच महायुती आहे. त्यात भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट), आरपीआयसह इतर लहान-मोठे पक्ष आहेत. त्यामध्ये राज ठाकरे येतील की नाही याबद्दल मी आधीच स्पष्ट केलं आहे आणि आजही पुन्हा तेच सांगेन की, अशी कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही, कुठलीही चर्चा सुरू नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here