मुंबई: ईव्हीएमचा वापर भाजपाकडून अतिशय धूर्तपणे केलं जात असून यात कोणताही घोटाळा नाही, हे लोकांना दाखवून देण्यासाठी ते राज्यांच्या निवडणुका विरोधकांना जिंकू देतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं असून हा मुर्खपणा असल्याचं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
जितेंद्र आव्हाड जे बोलत आहेत, त्यापेक्षा मोठा मुर्खपणा कोणताही असू शकत नाही. जर ईव्हीएमचा वापर करायचाच असता, तर भाजपाने कर्नाटक निवडणुकीदरम्यानही केला असता. खरं तर काही लोकांना मुर्खासारखं बोलायची सवय झाली आहे. आव्हाडांनी आता डोकं वापरून बोलावं, हा माझा त्यांना सल्ला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
#EVM हा घोटाळाचं आहे … let’s go back to paper ballot #SayNoToEVM pic.twitter.com/UGBXIQetnP
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2023
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर येथे भाजपाने ईव्हीएमचा वापर केला नाही का? असा प्रश्न काही नेटकऱ्यांकडून विचारण्यात आला होता. यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी आज सकाळी एक व्हिडीओ ट्वीट कर प्रतिक्रिया दिली.
“ईव्हीएमचा वापर भाजपाकडून अतिशय धूर्तपणे केलं जातो. ईव्हीएममध्ये कोणताही घोटाळा नाही, हे लोकांना दाखवून देण्यासाठी ते राज्यांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना जिंकू देतात. मुळात भाजपाला केवळ गुजरात, उत्तर प्रदेश आणि लोकसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे केवळ या तीन ठिकाणीच भाजपाकडून ईव्हीएमचा वापर केला जातो आणि म्हणूनच विरोधकांनी किती राज्यांच्या निवडणुका जिंकल्या तरी लोकसभेत त्याचा परिणाम दिसून येत नाही”, असे ते म्हणाले.