पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे डीएल.एड. (द्वितीय वर्ष) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे, दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची आता अडचण झाली असून, डीएल.एड. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.
राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, डीएल.एड.ची परीक्षा १० ते १८ जानेवारी या कालावधीत होणार आहे. तर, सीबीएसईतर्फे सीटीईटी ९ ते १३ जानेवारी या दरम्यान होणार आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरले आहेत. दोन्ही परीक्षांचा कालावधी समान असल्याने दोन्ही परीक्षा देणे उमेदवारांना अडचणीचे होणार आहे. त्यामुळे, आता परीक्षेचा प्रश्न उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र…
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना डीएल.एड. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत पत्र दिले आहे. सीटीईटी आणि डीएल.एड. परीक्षेला असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून डीएल.एड. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश परीक्षा परिषदेला देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.