Aryan khan l आर्यन खानच्या जामीनासाठी भाजप आमदार राम कदमांची प्रार्थना

drugs-case-bjp-mla-ram-kadam-tweet-aryan-khan-bail-hearing-news-update
drugs-case-bjp-mla-ram-kadam-tweet-aryan-khan-bail-hearing-news-update

मुंबई: क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Aryan khan) मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान भाजपा नेते राम कदम (Ram kadam) यांनी आज सुनावणी होणार असल्याने ट्वीट करत प्रार्थना केली आहे.

राम कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे”. राम कदम यांनी यावेळी ठाकरे सरकारवरही टीका केली आहे. “ही लढाई कोणा एक व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही, अखंड मानवजातीची ड्रग्सविरोधी लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्स प्रकरणात ड्रग्स माफियाच्या विरोधात उभे राहतील. मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला,” असं राम कदम म्हणाले आहेत.

“महबूबा मुफ्ती यांनीदेखील याचा आगामी निवडणुकीसाठी पुरेपूर उपयोग केला. जी ड्रग्सची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करू शकते त्याविरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र का येऊ शकत नाहीत. हे दुःख आहे,” अशी खंत राम कदम यांनी व्यक्त केली आहे.

“आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब, नेता, अभिनेता असो…कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले, त्या ड्रग्सविरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्सपासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी एक देशवासी या नात्याने शुभेच्छा,” असंही राम कदम म्हणाले आहेत.

आर्यन खानच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासोबतच मुंबईत एनसीबीच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून आर्यनच्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत असे म्हटले आहे.

संविधानाच्या अनुच्छेद ३२ अन्वये एक याचिका देताना शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. वाईट हेतूंसह गेल्या दोन वर्षांपासून एनसीबी पक्षपाती दृष्टिकोन स्वीकारत आहे आणि चित्रपटातील व्यक्ती, मॉडेल आणि इतर सेलिब्रिटींना त्रास देत आहे असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

“विशेष एनडीपीएस कोर्टाने (मुंबई) सार्वजनिक सुट्टीचा हवाला देत आर्यन खान आणि इतर आरोपींची जामीन याचिका २० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्याने आरोपींची मोठी बदनामी झाली आहे. आर्यन खानला १७ रात्री बेकायदेशीर तुरुंगात ठेवण्यात आले होते. हे राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या जीवन आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे पूर्ण उल्लंघन आहे,” असे तिवारी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here