मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ NCP Hasan Mushrif ED Raid यांच्या घरांवर छापेमार केली. सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली ही छापेमारी तब्बल १२ तासांनी संपली आहे. संध्याकाळी साधारण ७ वाजता ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर निघाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली. ईडीच्या या छापेमारीबाबत मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
चौकशी शांततेत पार पडली
“आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केले आहे. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली आहेत. आमच्या घरासमोर जे लोक उभे होते, त्यांचे मी आभार मानतो. चौकशी शांततेत पार पडलेली आहे. ही धाड राजकीय हेतूने झालेली आहे,” असे नावीद यांनी सांगितले.
कारवाई राजकीय हेतू समोर ठेवून कारवाई
“ईडीचे अधिकारी सकाळी साधारण सात वाजता आले होते. जोपर्यंत आमच्या पाठीशी जनता आहे, तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांना वरून फोन येत होते. त्याप्रमाणे ते कारवाई करत होते. ज्यांनी आमच्याविरोधात कारवाईचे षडयंत्र रचले, त्यांना जनता उत्तर देईल. आमच्यावर कारवाई होणार, हे मागील चार दिवसांपासून आमच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येत होते. ही कारवाई राजकीय हेतू ठेवून करण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांवर दबाव होताच,” अशी प्रतिक्रिया नावीद मुश्रिफ यांनी दिली.
विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जातंय- हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी ही कारवाई राजकीय हेतू समोर ठेवून करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. “चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजपाचे नेते दिल्लीत जाऊन आले. माझ्यावर कारवाई करावी, असे प्रयत्न त्यांनी केले. एकंदरीतच हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा प्रकारे कारवाया होत असतील तर याचा निषेधच झाला पाहिजे. नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्या म्हणतात अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल, याचा अर्थ विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे”, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.