‘खोके कुठे जातात, माझ्याकडे सगळा हिशोब! बोलायला भाग पाडू नका’; एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला इशारा

election-commission-of-india-passes-interim-order-on-shivsena-party-sign-bow-and-arrow-news-update-today
election-commission-of-india-passes-interim-order-on-shivsena-party-sign-bow-and-arrow-news-update-today

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केलेल्या आमदारांवर सातत्यानं ‘५० खोके’ म्हणत सध्या टीका केली जात आहे. विशेषतः शिवसेनेकडून (ShivSena) ही टीका होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून पुन्हा एकदा इशारा दिलाय. ‘खोके कुठे जातात? याचा माझ्याकडे सगळा हिशोब आहे’, असं शिंदे म्हणालेत.

मंगळवारी (३० ऑगस्ट) बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे नेते विजय वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ५० खोक्यांवरून होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं.

“बाळासाहेबांनी आपल्या विचारांशी आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी त्यांनी सत्तेला लाथ मारण्याचं काम केलं. ते म्हणायचे की, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही जवळ करता येणार नाही. त्यांना जवळ करण्याची वेळ येईल, तेव्हा मी माझं दुकान म्हणजे शिवसेना पक्ष बंद करेन, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली होती. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून आपण शिवसेना मोठी केली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली?

“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली? हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी कुणी केली? बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो. त्यांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली? आपल्याला मतं देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कुणी केली? हे सर्व आम्ही बोलू शकतो. सध्या मी सज्जन भाषेत बोलत आहे. पण यावर मी नक्की बोलणार आहे”, असा सूचक इशारा एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमात बोलताना दिला.

मुख्यमंत्री शिवसेनेचा, सत्ता चालवणारे वेगळेच होते -एकनाथ शिंदे

“बाळासाहेबांनी कधीही आपल्या भूमिकेशी प्रतारणा करण्याचं काम केलं नाही. अनेक प्रसंग आले, पण ते आपल्या विचारांवर ठाम राहिले. दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार स्थापन करावं लागलं. शिवसेना-भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या. लोकांनी बहुमत दिलं. आपल्याला कधीही वाटलं नव्हतं, ते सगळं घडलं. एक कार्यकर्ता म्हणून आम्ही पक्ष नेतृत्वाचं आदेश मानायचं काम केलं. दरम्यानच्या काळात शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी सत्ता चालवणारे वेगळेच होते”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : NCP : ‘५० खोके महागाई एकदम OK’आंदोलन…!

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

“खोके कुठे जातात आणि कोण-कोठे गद्दारी करतोय? हेही मला माहीत आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे. मला काम करायचं आहे. मला कामातून उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. त्यांनीही मला बोलायला भाग पाडू नये, एवढीच माझी इच्छा आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता इशारा दिलाय.

एकनाथ शिंदेंचा दुसऱ्यांदा इशारा

एकनाथ शिंदे यांनी ५० खोकेच्या घोषणेवरून यापूर्वीही सूचक इशारा दिला होता. पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या आमदारांकडून घोषणाबाजी केली गेली. या घोषणाबाजीवर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर देताना सूचक विधान केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here