
नवी दिल्ली: टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी शुक्रवारी ट्विटर (twitter) विकत घेण्यासाठीचा ४४ अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला आहे. ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी फेक अकाउंटची माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या करारातून माघार घेतल्यानंतर ट्विटर आता इलॉन मस्क यांच्यावर खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे.
इलॉन मस्क यांच्या वकिलांनी सांगितले की, ट्विटर अनेक विनंत्या करूनही बनावट किंवा स्पॅम खात्यांबद्दल माहिती देण्यात अयशस्वी झाले. “मस्क हा करार रद्द करत आहेत. ट्विटरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचा भंग केल्यामुळे ते असे करत आहेत. ट्विटरने इलॉन मस्क यांना चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. हा करार त्यावरच अवलंबून होता,” असे मस्क यांच्या वकिलांनी सांगितले.
“ट्विटरने त्या करारातील अनेक तरतुदींचे भौतिक उल्लंघन केले आहे. त्याने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे असे दिसते ज्यामुळे इलॉन मस्क यांना करार रद्द करण्यास प्रवृत्त केले,” असे इलॉन मस्क यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
ट्विटर कायदेशीर कारवाईही करणार
ट्विटरकडून सांगण्यात आले आहे की कंपनीला हे विलीनीकरण पूर्ण करायचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. कराराची अंमलबजावणी करण्यासाठी ट्विटर बोर्ड कायदेशीर कारवाई करण्याची योजना आखत असल्याचे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टायलो यांनी म्हटले आहे.
The Twitter Board is committed to closing the transaction on the price and terms agreed upon with Mr. Musk and plans to pursue legal action to enforce the merger agreement. We are confident we will prevail in the Delaware Court of Chancery.
— Bret Taylor (@btaylor) July 8, 2022
ब्रेट टेलर यांच्या या ट्विटला उत्तर देताना काही ट्विटर भागधारकांनी यांनी, इलॉन मस्क यांनी दंड भरावा आणि त्याने या करारामधून बाहेर पडावे असे त्यांनी म्हटले आहे. कारण त्यांना इलॉन मस्क यांना ट्विटरचे मालक म्हणून बघायचे नाही.
दरम्यान, एप्रिलमध्ये इलॉन मस्क आणि ट्विटरमध्ये ५४.२० डॉलर प्रति शेअर दराने सुमारे ४४ बिलियन डॉलरचा करार झाला होता. मात्र, त्यानंतर मे महिन्यात मस्क यांनी या करार थांबवला होता. मस्क म्हणाले होते की ट्विटरने प्रथम हे सिद्ध केले पाहिजे की प्लॅटफॉर्मवरील बॉट्स खाती पाट टक्क्यांपेक्षा कमी आहेत.
काही दिवसांपूर्वी, ट्विटरने सांगितले की पहिल्या तिमाहीत, त्याच्या कमाई करण्यायोग्य दैनिक सक्रिय वापरकर्त्यांमधील बनावट किंवा स्पॅम खात्यांची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी होती. ट्विटरच्या पहिल्या तिमाहीत २२.९० दशलक्ष युजर्स होते ज्यांना जाहिराती मिळाल्या होत्या. ट्विटर करारानंतर इलॉन मस्क यांनी या प्लॅटफॉर्मवरून ‘स्पॅम बॉट्स’ पूर्णपणे काढून टाकण्याविषयी सांगितले होते.