मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण अजूपर्यंत सर्वे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे. सरकार केवळ घोषणा मागून घोषणा करत आहे. ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे तर अंमलबजावणी मात्र शून्य आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकार वर्षभरापासून केवळ पोकळ घोषणा करत आहे. जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. या सरकारवर शेतकरी व जनतेचा भरोसा राहिलेला नाही. राज्यात सरकार आहे की नाही असे चित्र आहे. प्रशासनात अनागोंदी चालली असून जनतेला लुटले जात आहे. मुंबईसह राज्यात सगळीकडील रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत, सर्व रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे, या खड्डयांमुळे ट्रॅफिक जॅम होत असून लोकांचे नाहक बळी जात आहेत. खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचे काय झाले? असा संतप्त सवाल उपस्थित केला. राज्याची समृद्धी करायले निघालेल्या सरकारने समृद्धी महामार्ग मृत्युंचा सापळा बनवला आहे. विधानसभेत सरकारला प्रश्न विचारले तर मंत्री स्पष्ट उत्तरे देत नाहीत, तपासू, बघू, पाहू अशी उत्तरे दिली जातात.
राष्ट्रीय महामार्गावरील टोलसंदर्भात गाईडलाईन्स आहेत. रस्त्यावर खड्डे असतील तर टोल घेतला जात नाही पण नॅशनल हायवेवर खड्डे पडलेले असतानाही टोल वसुली केली जात आहे. टोलमाफियांचे राज्य असून सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. टोलमाफिया सरकारचे जावई आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.