मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे.अनिल देशमुख यांची जवळपास 13 तासांपासून ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (01 नोव्हेंबरला) ईडीसमोर हजर राहिले होते. ईडीकडून त्यांची जवळपास 13 तास मॅरेथॉन चौकशी सुरू होती. त्यांच्यावर जे आरोप होते, त्या अनुषंगानं चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी अटक करण्यात आली.
मनी लाँड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक
1 नोव्हेंबरला (काल) सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान ते ईडी कार्यालयात गेले होते. त्यानंतर जी त्यांची चौकशी सुरू झाली, ती आतापर्यंत सुरू होती. त्यांना वेगवेगळ्या कलमांनुसार अटक करण्यात आलीय. मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2 नोव्हेंबरला सकाळी त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांची सकाळी मेडिकल होणार असून, त्यानंतर ईडीच्या स्पेशल कोर्टात त्यांना नेण्यात येणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वीही अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती.
मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात या आधी 5 वेळा त्यांना समन्स बजावण्यात आले
विशेष म्हणजे अनिल देशमुख चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळालीय. अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हेदेखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी 7.30 सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात या आधी 5 वेळा त्यांना समन्स बजावण्यात आला होता. पण तरीसुद्धा ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. प्रकृती आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास टाळाटाळ केल्याचं सांगितलं जात होतं.
देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीकडे महत्त्वाचे पुरावे
विशेष म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही अटक झाली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीच्या महत्त्वपूर्ण पुरावे लागले होते. त्याच पुराव्यांच्या आधारेच त्यांना बेड्या ठोकल्या होत्या.
यापूर्वी सीबीआयकडूनही 10 ठिकाणी छापे
दरम्यान, सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले होते. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली होती. त्या पत्रानुसार निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचं युनिट हेड होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं होतं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले, तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये जमा होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येऊ शकते. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे.
मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश देत होते. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.