मुंबई : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. (Ex teacher mla-ramnath-mote passes away) ते ६८ वर्षांचे होते. मागील ४२ वर्षांपासून रामनाथ मोते हे शिक्षण चळवळीत विशेषतः शिक्षक शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर लढा देत होते.
शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण असल्याने कोकण विभाग शिक्षक मतदार संघातून ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेत विविध पदांवर त्यांनी कामे करून संघटना वाढविली होती. अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यासाठी शासनाकडे बाजू मांडून, पाठपुरावा करून तसेच सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करीत असतात. विधी मंडळात १०० टक्के उपस्थित राहत असत.
विधिमंडळाचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा विधिमंडळात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला होता. कायम विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबतचा लढा, स्वयंअर्थ सहयिता धोरणावर त्यांनी प्रचंड टीका केली होती. व याविरोधात मोठा लढा उभारला होता. शिक्षक मतदार संघातून दोनदा विधानपरिषदेवर निवडून आले होते.