
औरंगाबाद: हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह त्यांची पत्नी प्राजक्ता धस, भाऊ देविदास धस, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
बीड जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करत आहेत. याबाबत खाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने १८ ऑक्टोबर रोजी राम खाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते.
खाडे यांनी आपल्या तक्रारीत आमदार सुरेश धस यांचं नाव घेतल्याने त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला आणि सुरेश धस यांची याचिका फेटाळली.
त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदार राम खाडे यांची १३ जानेवारी २०२२ रोजी दाखल करण्यात आलेली तक्रार ग्राह्य समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेशदिले. त्यानुसार २९ नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.
हेही वाचा: Nagnath kottapalle passed away :ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन