jijau srushti: जिजाऊं’च्या लेकीसाठी

For Jijaun's daughter
For Jijaun's daughter

सकाळी, सकाळी रमेश चित्ते आणि दिलीप माहुरे दाजी यांचा फोन आला  म्हणाले, “दाजी एक वाईट बातमी आहे, अविनाश कदम यांची आई गेली.’’ मला एकदम धस्स झाले. मी परवा येतो, असे सांगून फोन ठेवला. अविनाश कदम पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते. गेल्या बावीस वर्षांपासून त्यांचे आणि माझे नातेसंबध. मी अविनाशला भेटायला ठरल्याप्रमाणे नांदेडला गेलो. चित्ते, माहुरे दाजी माझ्यासोबत होते. नांदेडमध्ये हनुमानगडजवळ जानकीनगर येथे अविनाश यांच्या घरी आम्ही पोहचलो. घरात अविनाश यांच्या आई कमलबाई यांच्या फोटोला मोठा हार घातला होता. काकूंचा फोटो पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. घरात अविनाशचे वडील नामदेव कदम गुरुजी, काका होते. आम्ही घरात बसलो. काकू कशा गेल्या हे काकांनी सांगितले. बोलता-बोलता काका म्हणाले, “अविनाशला त्याच्या आईपेक्षा प्रिय जिजाऊ स्मृती सृष्टी होती. त्याची आई कित्येक महिने दवाखान्यात पडून होती, त्याने आईची सेवा केली नाही.’’ काकांच्या बोलण्यातून सतत जिजाऊ सृष्टी, जिजाऊ सृष्टी, असे माझ्यासारखे ऐकण्यात येते होते. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न पाहून माहुरे दाजी म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून याच भागात असलेल्या ‘राजमाता जिजाऊ सृष्टी’ jijau srushti असा मोठा प्रकल्प शासन, प्रशासन, लोकसहभाग यांच्या मदतीने अविनाश उभे करीत आहेत. या ‘जिजाऊ सृष्टी’ने नांदेडच्या वैभवामध्ये मोठी भर घातली.’’ जसा नांदेडमध्ये गुरुद्वारा सर्वांना प्रिय आहे, तसे या जिजाऊ सृष्टीचे सर्वांना आकर्षण झाले आहे. माहुरे, चित्ते आणि कदम काका तिघेही ‘जिजाऊ सृष्टी’ बाबत भरभरून बोलत होते. मी काकांना म्हणालो, “अविनाश जिजाऊ सृष्टीकडेच गेलेत का?’’ काका म्हणाले, `हो’. आम्ही उठलो आणि `जिजाऊ सृष्टी’च्या दिशेने चालायला लागलो. अविनाश यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर भव्य  `जिजाऊ सृष्टी’ साकारली होती. बाहेरून वाटत होते आपण एखाद्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय. आम्ही आतमध्ये गेलो, दूर नजर टाकली तर अविनाश तिथल्या झाडांना पाणी टाकत होते. काकांनी अविनाशला आवाज दिला. अविनाशचे लक्ष आमच्याकडे गेले. हातातला पाईप बाजूला फेकत अविनाश आमच्याकडे आले. माझ्याजवळ येताच अविनाशने मला मिठी मारली. आमच्याकडे पाहून काकांच्या डोळ्यात पाणी आले. आई गेल्याचे दु:ख आणि खूप वर्षांची भेट अशी दोन्ही कारणे त्या मिठीमागे होती.

आईविषयी बोलावे का जिजाऊ सृष्टीविषयी बोलावे, अशी गडबड अविनाशच्या मनामध्ये सुरू होती. अविनाशने माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली ती `जिजाऊ सृष्टी’पासूनच. जिजाऊ सृष्टी, ती उभी करण्याची भूमिका, त्यातून मोठे काय होणार आहे. आईने सर्वांचा घेतलेला निरोप हे सर्व काही अविनाश सांगत होते.पुरोगामी चळवळीमध्ये काम केलेल्या माणसांचे काम आकाशाला गवसणी घातल्यासारखे असते. अविनाशचेही तसेच होते. वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये काम केल्याचे अंग असलेल्या अविनाशने त्यांच्या `राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान’च्या माध्यमातून `जिजाऊ सृष्टी’चे स्वप्न साकारण्यासाठी पुढाकार घेतला. २० वर्षांच्या मेहनतीने अविनाशने `जिजाऊ सृष्टी’ अंतिम टप्प्याकडे नेण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. अविनाशचे वडील नामदेवराव एक आदर्श शिक्षक म्हणून सर्वपरिचित. जे काय उभे करायचे, ते पुढे चिरंतर टिकले पाहिजे, हीच शिकवण अविनाशला वडिलांकडून मिळाली. त्या शिकवणीतून उभी राहिलेली वास्तू `जिजाऊ सृष्टी’च्या रूपाने समोर दिसत होती. जिजाऊंच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापर्यंत सारा इतिहास इथे चित्राच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आला होता. या चित्राचे स्केच काढले होते चित्रकार दिलीप कदम यांनी. चित्र बनवली शिल्पकार व्यंकट पाटील यांनी. प्रत्येक चित्राच्या खाली जे ऐतिहासिक प्रसंग लिहिले होते ते श्रीमंत कोकाटे यांनी. `जिजाऊ सृष्टी’बद्दल काय सांगू आणि काय नाही, असे अविनाशला झाले होते.

अविनाशने माझा हात पकडला आणि सारी ‘जिजाऊ सृष्टी’ तो मला दाखवत होता. तो ‘जिजाऊ सृष्टी’  मला अशी सांगत होती जणू तिथल्या प्रत्येक वीट आणि वस्तूला अविनाशचा स्पर्श झाला आहे.

जिजाऊ चरित्राचा अभ्यासक असणाऱ्या अविनाशला जिजाऊ यांच्याप्रमाणे अनेक स्त्रिया, मुली घडल्या तर चिरंतर टिकणारे समाज परिवर्तन घडेल हे माहिती होते. त्यातूनच `जिजाऊ सृष्टी’ची निर्मिती समोर आली. प्रत्येक मुलगी, महिला जिजाऊ बनू शकते, या भावनेतून या सृष्टीची निर्मिती झाली. जिजाऊंची शौर्यगाथा, जिजाऊंनी घडवलेले शिवाजी महाराज, जिजाऊंची रणनीती, सामाजिकता, मूल्यधारना, हे सर्व काही चित्रांच्या, देखाव्यांच्या  माध्यमातून दाखवण्यात आले होते.

महिला, मुली ज्यांना कुणाला राजमाता जिजाऊंच्या सच्च्या पाईक बनायचे आहे त्यांनी ‘जिजाऊ सृष्टी’त जाऊन तिथला अंगावर काटे आणणारा इतिहास एकदा डोळ्यांखालून घाला. तिथे असणाऱ्या जिजाऊंच्या पायावर डोके ठेवा, म्हणजे त्यांच्या मोठेपणाचे कण तुमच्या मेंदूला चिकटतील. अशी खासियत त्या ‘जिजाऊ सृष्टी’ची होती, हे मी अनुभवत होतो.   

एका मोठ्या हॉलकडे आमचे लक्ष वेधत काका म्हणाले, ही मुलींची अभ्यासिका आहे. या ‘जिजाऊ सृष्टी’चे सगळ्यात वैशिष्ट्य काय असेल तर ही मुलींची अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेसाठी माझा खूप आग्रह होता. या अभ्यासिकेमध्ये दीडशे मुली एकावेळी अभ्यास, जिजाऊ चरित्राचे पारायण करणार आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई असा सर्वांची आई म्हणून भूमिका बजावणाऱ्या मातांचे आत्मचरित्र, त्यांची माहिती देणारी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके येथे असतील. किमान पंधरा हजार पुस्तकांचा ‘गोतावळा’ इथे असणार आहे.

अविनाश कदम ( ७९७२३७८०८४) म्हणाले, मी जे जे विषय या जिजाऊ सृष्टीच्या अनुषंगाने हेरले होते, ते ते विषय मला प्रत्यक्षात आणायचे होते. ते सर्व विषय मी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सर  यांना सातत्याने सांगत गेलो. चव्हाण सर यांनी जिजाऊ सृष्टीसाठी माझ्याइतकीच जीव ओतून मला मदत केली. शासन, प्रशासन, नांदेड मनपा  आणि लोकसहभाग या सगळ्यांच्या माध्यमातून या ‘जिजाऊ सृष्टी’ला हातभार लागला. काम पूर्णत्वास नेण्यासाठी आजही मदतीची गरज आहे. केवळ दिखावा नाही तर या जिजाऊ सृष्टीच्या माध्यमातून खूप काळ टिकणारी संस्कृती उभी राहावी. अनेक महिला, मुली येथे घडाव्यात हा उद्देश आहे, असे अविनाश मला सांगत होते.

`जिजाऊ सृष्टी’मधल्या एका झाडाखाली आम्ही जाऊन सगळेजण बसलो. मी हळूच आईचा विषय काढला, अविनाश कमालीचे हळवे, डोळे पुसत मला सांगत होते. माझी आई तिकडे दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिचा आजार हाताच्या बाहेर गेलाय आणि ती आज ना उद्या सोडून मला जाणार आहे, याची कल्पना मला होती. तिच्या  आजारपणाच्या काळामध्ये मी तिच्याजवळ थांबणे अपेक्षित होते, पण त्याच वेळेला `जिजाऊ सृष्टी’चे काम अधिक गती घेत होते. `जिजाऊ सृष्टी’ उभी करताना काय पाहिजे. त्याचे स्वरूप काय असले पाहिजे. ते जोपर्यंत आपण समोर उभे राहून करून घेत नाही तोपर्यंत ते निर्माण होऊ शकत नाही. हे माझ्या अनेक वर्षांच्या कामातून लक्षात आले होते. त्यामुळे आजारपणात मला आईला अजिबात वेळ देत आला नाही. एक जिजाऊ मला तिकडे सोडून जात होती आणि दुसरी जिजाऊ इकडे `जिजाऊ सृष्टी’च्या माध्यमातून निर्माण होत होती. आजारपणाच्या काळामध्ये आईने मी भेटावे, जवळ राहावे असा ध्यास घेतला. माझा ध्यास मात्र जिजाऊ सृष्टी होती. आई आणि `जिजाऊ सृष्टी’ हे दोन टोक होते. इकडे `जिजाऊ सृष्टी’ उभी राहिली. तिकडे आई जात राहिली. आई जाण्यागोदर दोन दिवस अगोदर मी आईला भेटायला गेलो. मी परत निघताना आईने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला. माझ्या डोळ्यात डोळे टाकून ती म्हणाली, अविनाश सगळ्यांचे चांगले होईल असे बघ. स्वतःची काळजी घे. तुझी `जिजाऊ सृष्टी’ पाहायला मी खाली नसले तरी ती जिजाऊ सृष्टी मी वरतून नक्की पाहीन. तिच्या डोळ्यांतले पाणी खाली पडायच्या अगोदरच तिने ते पाणी पुसले. तिला वाटले असेल ती रडली तर मी कमकुवत होईन. मी `जिजाऊ सृष्टी’चे काम सोडून तिच्याकडेच बसेन.

 मी आईपासून निघालो आणि तिसऱ्या दिवशीच आई गेली. भावुक झालेल्या अविनाशची माहुरे आणि चित्ते दाजी समज काढत होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. आम्ही अश्रूंभरले डोळे पुसून पुन्हा डोळे उघडल्यावर समोर `जिजाऊ सृष्टी’ होती. आम्ही जिजाऊ सृष्टीमध्ये अजून एक चक्कर मारली. रडून मोकळे झालेले अविनाश काळजीच्या मुद्रेमध्ये गेले होते. अविनाश म्हणाले, आतापर्यंत दोन कोटी रुपयांच्यावर यासाठी खर्च झालाय. पदरमोड, शासन, राजकीय मंडळी, नांदेड मनपा, अनेक दाते यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले. ते काम अजून पुढे जाण्यासाठी किमान एक कोटी रुपयांची गरज आहे. हे एक कोटी रुपये गोळा कसे करायचे, हा माझ्यासमोर प्रश्न आहे.

 मी अविनाशच्या खांद्यावर हात टाकत म्हणालो, सुरुवात करत असताना तुमच्याकडे दोन रुपये नव्हते. झाले ना दोन कोटी रुपये जमा. हेही एक कोटी जमा होतील. नका काळजी करू, धडपड सुरू ठेवा. तुमच्या धडपडीतून पुढचे चारशे वर्षे हेवा वाटावा, असा इतिहास निर्माण होणार आहे.

`जिजाऊ सृष्टी’त काढलेले प्रत्येक चित्र पाहिल्यावर, त्या चित्राच्या खाली लिहिलेला प्रत्येक संदेश वाचल्यावर अंगावर काटा उभा राहत होता. असे वाटत होते की किमान अजून पाच-सहा तास तिथेच बसून राहावे.

 खूप मोठे काहीतरी निर्माण केले, याचा अभिमान जसा अविनाश यांच्या रोमारोमात होता तसा तिथली कलाकृती पाहताना आपण काहीतरी वेगळे अनुभवतोय याची जाणीव पावलोपावली होत होती.

अविनाश, नामदेव गुरुजी, काका यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. चळवळीत राहून आपण वेगळे काहीतरी केले पाहिजे आणि त्या वेगळेपणाला चिरंतर टिकणारी झालर लागली पाहिजे. असे काम प्रत्यक्षामध्ये साकार करणारा अविनाश माझ्यासमोर एक उत्तम उदाहरण होते. आपण काहीतरी शिकलो आणि त्यामधून पुढच्या पिढीसमोर एक वेगळा आदर्श आपण ठेवून जाणार आहोत. हे सारे काही अविनाश यांच्या कामांमधून पुढे आले होते. हल्ली आपल्याकडे पुतळे आणि स्मारक उभारण्याची स्पर्धा लागलेली आहे, पण त्या पुतळ्याने स्मारकाच्या माध्यमातून चिरंतर टिकणारे काहीतरी उभारणार आहोत, याचे उदाहरण फक्त नांदेडच्या अविनाश यांच्यासारखे एखादे सापडू शकते. बरोबर ना…!

संदीप काळे, लेखक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here