सरकारला पाझर फुटत नसेल तर त्यांना घाम फोडा;उध्दव ठाकरेंचे शेतक-यांना आवाहन

Uddhav Thackeray's press conference at 5 pm,
Uddhav Thackeray's press conference at 5 pm,

औरंगाबाद:आयुष्यात अनेक संकटं येत असतात. पण शेतकऱ्यांनो आत्महत्येचा विचार मनात आणू नका. ऐनवेळी राज्यात सरकार बदललं असलं तरी शिवसेना (ShivSena) तुमच्या पाठीशी आहे. सरकारला पाझर फुटत नसेल तर त्यांना घाम फोडा, असं आवाहन  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शेतकऱ्यांना केलं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान, त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ओल्या दुष्काळाची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, त्यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला. “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, त्यांचा दौरा हा २४ मिनिटांचा होता” या अब्दुल सत्तारांच्या विधानावरून उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं. सत्तारांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ते सत्तेसाठी किती आंधळेपणाने वागत आहेत, हे पाहून मला कीव येते. स्वत:ची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याच्या एका कारणासाठी त्यांनी सत्तांतर घडवलं. आमच्याशी गद्दारी केली आहे, पण निदान आमच्या अन्नदात्याशी गद्दारी करू नका. नेमका आणखी किती पाऊस पडल्यानंतर तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणणार आहात? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

माझा शेतकरी दादा खोटं बोलू शकत नाही. ओल्या दुष्काळाचं नेमकं सत्य काय आहे? हे पाहण्यासाठी मी ऐन दिवाळीत येथे आलो आहे. माझ्यामुळे हे सत्य जगासमोर येईल. हा माझा प्रतिकात्मक दौरा आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पीक नासून गेलं आहे. त्यांचं सोनं डोळ्यादेखत मातीमोल झालं आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here