Parambir Singh l परमबीर सिंग देश सोडून फरार, तपास यंत्रणांना संशय!

former-mumbai-police-commissioner-parambir-singh-fled-country-suspects-nia-state-government-news-update
former-mumbai-police-commissioner-parambir-singh-fled-country-suspects-nia-state-government-news-update

मुंबई l मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेच्या भीतीपोटी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय एनआयए (NIA) आणि राज्य सरकारला (Maharashtra Government) आहे. एनआयएने अँटिलिया स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं होतं.

सचिन वाझेच्या अटकेनंतर एप्रिल महिन्यात एनआयएने सर्वात प्रथम परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझेवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईसंबंधी माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला होता. प्रकरण उजेडात आलं होतं तेव्हा सचिन वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते.

एनआयएने नुकतंच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे. एनआयएच्या सूत्रांनुसार, ऑगस्टमध्ये परमबीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही. अधिकारी हरियाणात चंदीगड आणि रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानीदेखील गेले होते, पण ते सापडले नाहीत.

खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यावर चौकशीला प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांकडूनही लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र परमबीर सिंग नक्की आहेत कुठे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून कारवाईची शक्यता लक्षात घेऊन परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी विदेशात पलायन केल्याची शक्यता आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग हे देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. राज्य सरकारने कारवाईच्या दृष्टीने पावले टाकल्यावर परमबीर सिंद यांनी मुंबई सोडून चंडीगडमध्ये आश्रय घेतला होता. वैद्यकीय कारणास्तव सिंह सुट्टीवर आहेत. या काळात त्यांनी चंडीगडमधील डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पाठविल्याचं सांगण्यात येतं.

ईडीने अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक केली. त्यानंतर देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आलं. यावरून देशमुख यांना अटक करण्याची केंद्रीय यंत्रणेची तयारी झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई सुरू केली.

हेही वाचा – …ही वेळ आणीबाणीची आहे,राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचा जसंच्या तसं!

सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात काही जणांना अटकही झाली. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी पाचारण केले; पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नव्हता. म्हणूनच ठाणे पोलिसांनी सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस बजाविली.

भाजपा नेत्यांचा आशीर्वाद असल्यानेच परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेण्याचे धाडस केले अशी तेव्हाच चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्र पोलीस अटक करतील या भीतीनेच परमबीर सिंह यांनी मुंबईत राहण्याचे टाळलं होतं. राज्य सरकारने कारवाईचा फास आवळल्यानेच परमबीर सिंग हे देश सोडून गेल्याची चर्चा आहे.

मे महिन्यापासून संपर्क नाही

सूत्रांच्या माहितीनुसार, गृहविभाग मे महिन्यापासून परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ५ मे रोजी परमबीर सिंग सुट्टीवर गेले होते. परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण पाच एफआयआर दाखल असून यापैकी तीन प्रकरणांचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here