Global Hunger Index : भारताची जागतिक भूक निर्देशांकात घसरण; पाकिस्तान व नेपाळपेक्षाही परिस्थिती वाईट!

जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि भारताचा छोटा भाऊ मानला जाणारा नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.

global-hunger-index-india-fall-behind-pakistan-nepal-financial-condition-news-update-today
global-hunger-index-india-fall-behind-pakistan-nepal-financial-condition-news-update-today

नवी दिल्ली : भारतीय चलनाची घसरण होत चालली आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कमी पडझड झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतंच नमूद केलं. दरम्यान, जागतिक भूक निर्देशांकात मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घरसरण झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि भारताचा छोटा भाऊ मानला जाणारा नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.

२०२१मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या यादीत भारत १०१व्या स्थानावर होता. हे स्थानदेखील भारतातील भूकेसंदर्भातली गंभीर परिस्थिती विशद करण्यासाठी पुरेसं होतं. मात्र, यावर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन सहा अंकांची घसरण झाली आहे. १२१ देशांमध्ये आता भारत १०७व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९), श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी लागते.

”कन्सर्न वर्ल्डवाईड’ आणि ‘वेल्थ हंगर लाईफ’ या संस्थांकडून संयुक्तपणे दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. संबंधित देशामध्ये उपाशीपोटी राहणाऱ्या लोकांच्या आकडेवारीवरून भूकेची तीव्रता किती आहे, या निकषावर त्या त्या देशांचं मूल्यांकन केलं जातं. त्यानुसार रँकिंग करण्यात येतं. भारताला या निकषांवर २९.१ इतकं रँकिंग मिळाल्यामुळे भारताची यादीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ९.९ पेक्षा कमी गुण असल्यास त्या देशातील परिस्थिती चांगली मानली जाते.

 हे चार महत्त्वाचे निकष…

दरम्यान, ही यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने चार महत्त्वाचे निकष आधारभूत मानले जातात. यामध्ये कुपोषण, पाच वर्षांच्या खालील मुलांना त्यांच्या उंचीच्या तुलनेत किती कमी आहार मिळतो, पाच वर्षांच्या खालील किती मुलांची त्यांच्या वयाच्या तुलनेत उंची कमी आहे आणि दरहजारी आकड्यामागे पाच वर्षांखालील किती मुलं दगावतात या निकषांच्या आधारे जागतिक भूक निर्देशांकाची मांडणी केली जाते.

दरम्यान, या यादीमध्ये सर्वात तळाला म्हणजेच १२१व्या स्थानी येमेन हा देश आहे. तर सर्वात वर असणाऱ्या देशांमध्ये चीन आणि कुवेत या आशियायी देशांचा समावेश आहे. युरोप खंडातील देशांचा यादीत वरच्या स्थानी क्रमांक लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here