G-20: पाहुण्यांना ‘पौष्टिक’ मेजवानी; जी-२० परिषदेसाठी नाचणीची इडली, ज्वारीचा डोसा

guests-at-g-20-summit-will-be-treated-to-feast-of-nutritious-food-news-update-today
guests-at-g-20-summit-will-be-treated-to-feast-of-nutritious-food-news-update-today

औरंगाबाद : शहरात या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेतील महत्त्वाच्या बैठकीमध्ये पर्यटनाचे ब्रँडिंग करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करत असताना, या परिषदेतील पाहुण्यांना पौष्टिक पदार्थांची मेजवानी देण्याचे ठरवले आहे. यामध्ये नाचणीची इडली, ज्वारीच्या डोशापासून विविध पदार्थांची रेलचेल असणार आहे.

दीडशे प्रतिनिधींचा सहभाग

‘जी-२०’ गटाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी विविध देशांचे दीडशेहून अधिक प्रतिनिधी ‘विमेन-२०’ या परिषदेसाठी औरंगाबादेत येत आहे. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. ही बाब लक्षात परिषदेच्या निमित्ताने पाहुण्यांसाठी खास पौष्टिक तृणधान्यपासून तयार केलेला खास नाश्ताही असणार आहे. यात नाचणी, उडीद डाळीपासून तयार केलेली इडली, ज्वारीचा डोसा, नाचणीच्या लाडवांसह ज्वारीचा पास्ता, ज्वारी, बाजरीचे बिस्किटसह इन्स्टंट बेबी फूड आदी पदार्थाची रेलचेल असणार आहे.

शहराचे ब्रँडिंग

जी-२० परिषदेमध्ये १९ देश आणि युरोपीय महासंघाचा समावेश आहे. औरंगाबादेत विविध देशांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था असे मिळून सुमारे १५०हून अधिक प्रतिनिधी येत आहे. हे प्रतिनिधी २६ फेब्रुवारी रोजी येण्यास सुरुवात होईल; तर २७ फेब्रुवारी रोजी वंदे मातरम सभागृहात विमेन-२० या परिषदेचे उद्घाटन होईल. तर दुसऱ्या दिवशी जालना रोडवरील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये विविध विषयांवर परिसंवाद होईल. पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. या परिषदेच्या माध्यमातून शहरातील उद्योग, पर्यटन क्षेत्राचे ब्रँडिंग जोमात व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारतीय पदार्थ

शहरातील दोन नामांकित हॉटेलमध्ये हे पाहुणे वास्तव्यास असणार आहे. भोजन, नाश्त्यासाठी त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेता तसे नियोजन करण्यात आले आहे. सोबतच भारतीय पदार्थांची रेलचेलही असणार आहेत. यात खास नाश्त्यामध्ये पौष्टिक तृणधान्यपासून तयार केलेल्या पदार्थाचा समावेशही असणार आहे. यात नाचणी, उडीद डाळीपासून तयार केलेली इडली, ज्वारी, बाजरी, हरभरा डाळीचे पीठ व काळा गहू यापासून तयार केलेला मल्टीग्रेन पराठा, वरई, मक्याचे पीठ, नाचणी, जायफळ आदीपासून तयार केलेला फ्रुट सलाद, नाचणी,ज्वारीचा डोसा, ज्वारी लाडू यात, ज्वारीसह ड्रायफ्रुट्, शेगदाणे, गुळ आदीचा वापर करण्यात आला असून यासह नाचणी लाडूचा समावेश असणार आहे. तसेच ज्वारीचा पास्ता, ज्वारी, बाजरीचे बिस्किटसह इन्स्टंट बेबी फूड आदी पदार्थाची रेलचेल असणार आहे.

बचत गटांची मदत

जी-२० परिषदेच्या मेन्यूसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, उपायुक्त उज्ज्वला बावके, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, सुवर्णा पाडके, मंजुषा काचोळे, निलिमा मोरे, अपूर्वा पद्मे, किशोर पाडळे, विकास वाघमारे, विशाल साळवे व टीम परिश्रम घेत आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी ही टीम महिला बचत गटांना मार्गदर्शन करत असून, बचत गटांच्या माध्यमातून या पदार्थाचा स्टॉल संबंधित हॉटेलमध्ये भोजन कक्षात असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here